
काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, याबाबतची उत्सुकता आता वाढली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तारखा जवळ येत असल्याने उमेदवारांमध्येही तूतू- मैमै होत आहे. काँग्रेस अध्यक्षपदाचे मतदान 17 ऑक्टोबरला होणार असून 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत या पदासाठीचे उमेदवार शशी थरुर यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. काँग्रेस पक्षात बदल व्हावे, असे ज्यांना वाटते, त्यांनी आपल्याला मते द्यावीत. तसेच पक्षात सर्व आलबोल आहे असे वाटते, त्यांनी आपल्याला मत देऊ नये, असे थरुर यांनी म्हटले आहे. 2014 आणि 2019 मध्ये मतदानापासून दूर राहिलेल्या मतदारांनी यावे आणि मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले. आपल्याला काँग्रेस पक्षात बदल घडवायचा आहे, असेही थरुर म्हणाले. पक्षातील अनेक वरिष्ठ नेते दुसऱ्या बाजूला आहेत. तर सामान्य कार्यकर्ते आपल्या बाजूने आहेत, असेही थरुर यांनी सांगितले. काही नेते पक्षपातीपणा करत असल्याचेही ते म्हणाले.
मी या निवडणुकीसाठी पॅराशूटने आलेलो नाही. आपण तीन वेळा राज्यसभा आणि लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या आहेत. तर या निवडणुकीतले आपले प्रतिस्पर्धी मल्लिकार्जुन खरगे यांचा 2019 च्या निवडणुकीत पराभव झाला होता, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षपदी निवड झाल्यास पक्षात संघटनात्मक बदल करणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे पक्षात बदल हवा असेल, त्यांनी आपल्याला मते द्यावीत, असे आवाहन त्यांनी केले.



























































