
मिंधे सरकारच्या राजवटीत मुंबईमध्ये डान्स बारचा धिंगाणा सुरू आहे. नियम धाब्यावर बसवून ऑर्पेस्ट्रा असल्याचे दाखवत पोलिसांच्या संरक्षणात पहाटेपर्यंत सर्रास डान्स बार चालवले जात आहेत, असा खळबळजनक आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला. या डान्स बारवर छापे टाकून कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मुंबईत रात्रभर आणि पहाटेपर्यंत डान्स बार चालू असतात. स्थानिक पोलिसांकडे तक्रार देऊनही त्यावर कारवाई केली जात नाही. उलट बारचालकांकडून तक्रारदारांनाच धमकावले जात आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. विजय वडेट्टीवार म्हणाले की, बारचालक, पोलीस, पोलिसांचे खबरी आणि स्थानिक गुंड असे सिंडिकेट बनले आहे. हे सिंडिकेटकडून तक्रारदारांना केवळ धमकावलेच जात नसून मारहाणही केली जात आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
पोलीस, खबरी, गुंडांना हप्ते
पहाटेपर्यंत बार चालू ठेवून लाखो रुपयांची उलाढाल होते. त्या रकमेतून बारचालकांकडून पोलीस, खबरी आणि स्थानिक गुंडांना हप्ते दिले जातात. त्यामुळेच बारवर कारवाई होत नसल्याचाही आरोप वडेट्टीवार यांनी केला.
























































