
सामना प्रतिनिधी। शिर्डी
शिर्डी शहरातील हॉटेल शांतीकमलमध्ये लग्न सोहळ्यात 50 तोळे सोन्याने भरलेली दागिन्यांची बॅग चोरी गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मालेगाव येथील पटणी परिवार आणि नाशिक येथील शाह परिवाराचा विवाह सोहळा रविवार 30 रोजी शिर्डीत शांतीकमल हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये वधूला घालण्यासाठी वर पक्षाकडुन आणलेली 50 तोळे सोन्याच्या दागिने एका बॅग मध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान दुपारी 2 वाजेच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून सोन्याची बॅगच लांबवली आहे. सदर बॅगमध्ये साधारण पन्नास तोळे सोने असल्याचे सांगितले जात आहे.
शिर्डी पोलिसांनी याठिकाणी येवून सी.सी.टि.व्ही .कॅमेराची पाहणी केली असून यात दोन युवक ब-याच वेळ याठिकाणी रेंगाळत असल्याचे चित्र दिसून आले आहे.याच दोन मुलांनी बँगवर पाळत ठेवत तसेच विवाह सोहळ्याच्या स्टेजजवळ नातेवाईक बोलण्यात गुंतलेले असतांना सोप्यावर ठेवलेली बॅग एक युवक घेवून फरार झाला असल्याचे कॅमेरात स्पष्ट दिसत आहे. यासंबधी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस पथक सी.सी.टि.व्ही.चे तपासणी करत आहे. शिर्डी पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना केली आहे. शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
































































