गावाला काहीच नाही, शिर्डीतील ग्रामस्थ संतापले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शिर्डी

विदर्भातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी साई संस्थानच्या तिजोरीतून ७१ कोटी देण्याच्या निर्णयावरून शिर्डीतील ग्रामस्थ संतापले आहेत. शुक्रवारी सर्व ग्रामस्थांनी बैठक घेवून संस्थानच्या या निर्णयाविरोधात लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी साईसंस्थान विश्वस्त मंडळाची बैठक असुन राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर साईसंस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांचे स्वागत होण्याऐवजी त्यांना ग्रामस्थांच्या आंदोलनाला सामोरे जावे लागणार आहे.

विदर्भातील नागपुर, चंद्रपूर, यवतमाळ व घाटी रूग्णालयातील यंत्रसामुग्री खरेदीसाठी साईसंस्थानच्या तिजोरीतून ७१ कोटी देण्याचा निर्णय साई संस्थान विश्वस्त व्यवस्थेने घेतला आहे. त्यावरून शिर्डीतील ग्रामस्थ चांगले संतापले आहेत. साईंबाबा संस्थानची साईंबाबा सुपर स्पेशालीटी व साईनाथ हॉस्पिटल ही दोन रूग्णालये शिर्डीत असुन ही दोन्ही रूग्णालये चार वर्षापुर्वी राज्यात व देशात नावारूपाला आली होती. मात्र अलिकडच्या काळात संस्थानच्या या दोन्ही रूग्णालयांसाठी आवश्यक असलेले डॉक्टर व नर्स तसेच यंत्र सामुग्री नसल्याने ती अडचणीत आली आहेत. रूग्णांना चांगल्या सेवा मिळत नाहीत. अशा परिस्थीतीत या रूग्णालयासाठी साईसंस्थानने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याऐवजी विदर्भातील रूग्णालयांना निधी देण्याचे धोरण शिर्डी ग्रामस्थांना मान्य नाही.

शिर्डीचे नगराध्यक्ष कैलाश कोते, अभय शेळके, उपनगराध्यक्ष सुजीत गोंदकर, नितिन कोते, विजय कोते, ताराचंद कोते, जगन्नाथ गोंदकर, पोपट शिंदे, दत्ता कोते, सचिन कोते, आशोक गोंदकर, गोपीनाथ गोंदकर, मंगेश त्रिभुवन, महेंद्र शेळके, रमेश गोंदकर, भाउसाहेब कोतोरे, अरूण चौधरी यांच्यासह शिर्डीसह परिसरातील प्रमुख कार्यकर्ते व शिर्डी ग्रामस्थांची संयुक्त बैठक शिर्डी येथील हॉटेल सिटी हार्ट येथे शुक्रवारी झाली. या बैठकीत साईसंस्थान विश्वस्तांच्या विरोधात लढ़ा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शनिवारी साईं स्थान विश्वस्त मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीच्या दिवशीच शिर्डी ग्रामस्थ आंदोलन करून विश्वस्थांना बाहेर निधी दिल्याबद्दल जाब विचारणार आहेत. विश्वस्त मंडळ आंदोलकांना कसे सामोरे जाणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.