तोच जोश, तोच फॉर्म! नवे पुस्तक लवकरच लेखणीला चिरतारुण्याचे वरदान! शिरीष कणेकर यांचे 80 व्या वर्षात पदार्पण 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खुमासदार ‘कणेकरी’ शैलीमुळे वाचकांमध्ये लोकप्रिय असलेले शिरीष कणेकर 6 जून रोजी 80 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. असं म्हणतात, सच्च्या कलावंतासाठी वय हा निव्वळ आकडा असतो. कणेकरांच्या बाबतीत हे तंतोतंत लागू पडतंय. ऐंशीच्या घरात असलेले कणेकर त्याच जोमाने आणि ईर्षेने लिहीत आहेत. त्यांचे वय, त्यांचा उत्साह आणि त्यांचा ‘फॉर्म’ झाकोळू शकले नाही. लवकरच त्यांचे 48 वे पुस्तक वाचकांच्या हाती येणार आहे. तेही त्यांचे आराध्य दैवत असलेल्या लता मंगेशकर यांच्यावरचे!

शिरीष कणेकर गेली अनेक दशके अविरत लिहीत आहेत. व्यक्तिचित्रं ही तर त्यांची खास पीच. तिथे ते कमालीचे रंगतात, रमतात. ओघवत्या शैलीत त्या व्यक्तीचे अंतरंग उलगडून सांगतात. त्यांच्या लेखणीतून कित्येक सरस आणि सकस व्यक्तिचित्रं उतरली आहेत. लतादीदी म्हणजे त्यांची मर्मबंधातील ठेव. दीदींच्या आठवणींचा खजिनाच त्यांच्याजवळ आहे. म्हणूनच कणेकर यांचे आगामी पुस्तक विशेष ठरणार आहे. हे लता मंगेशकर यांचे चरित्र नसून त्यांचे विविध गुणदर्शन घडवणारी ही लेखमाला आहे, असे कणेकरांनी सांगितले. ‘कणेकरी’ शैलीतील त्यांचे लेखन आणि दुर्मिळ पह्टो म्हणजे वाचकांसाठी पर्वणी ठरणार आहे. विशेष म्हणजे 92 वर्षांचे आयुष्य जगणाऱया दीदींनी गायलेली 92 गाणी या पुस्तकात असतील, अशी माहिती कणेकरांनी दिली.

मी सातत्याने लिहितोय. वयाच्या 25 व्या वर्षापासून लिहायला सुरुवात केली. त्यात कधी खंड पडला नाही. वर्तमानपत्रांमध्ये स्तंभलेखन केले. त्यामुळे बरेच साहित्य जमले… कणेकर आपल्या लेखणीला लाभलेल्या चिरतारुण्याचे गमक सांगतात.

कणेकरांची डॉलरच्या देशा (प्रवास वर्णन), यादोंकी बारात (कलाकारांची ओळख), मी माझं मला (आत्मचरित्र), यार दोस्त (व्यक्तिचित्र), रहस्यवल्ली (रहस्यकथा), लगाव बत्ती (स्तंभलेखन) आदी अनेक पुस्तके गाजली आहेत. ‘गोतावळा’, ‘अघळ पघळ’, ‘मेतकुट’, ‘कट्टा’ ही पुस्तके वाचकांना आवडली. कणेकरांनी विषयाच्या बंधनात स्वतःला अडकून न घेता लेखनात मुक्त संचार केला. चित्रपट, संगीतात त्यांचा जीव गुंतला. तीच गोष्ट क्रिकेटची. त्यांनी जो लेखनाचा बाज निवडला त्याला वाचकांनी उदंड प्रेम दिले. त्याजोडीने मराठी रंगमंचाला स्टॅण्डअप कॉमेडीचा नजराणा कणेकरांनी दिला. त्यांच्या ‘माझी फिल्लमबाजी’ या एकपात्री प्रयोगाचे देशविदेशात अनेक प्रयोग झाले. एकटय़ा अमेरिकेत त्यांनी शंभर प्रयोग केले. त्यांनी ‘कणेकरी’ आणि क्रिकेटवरील ‘फटकेबाजी’ असे दोन एकपात्री प्रयोगही रंगमंचावर आणले. त्यालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.