कृष्ण जन्माष्टमीनंतर मुंबईत प्रचंड उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करताना 245 गोविंदा जखमी झाले. यामधील 213 जणांवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला तर 32 जणांवर अजूनही पालिकेच्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. शिवसेनाप्रणीत शिव आरोग्य सेनेकडून कालपासूनच जखमी गोविंदांवर उपचारासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येत आहे. आज शिव आरोग्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या विविध रुग्णालयांत जाऊन जखमींची विचारपूस केली. शिवाय आवश्यक आरोग्य सुविधा मिळवून देण्याचे काम केले.
दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी गोविंदांसाठी पालिकेच्या केईएम, शीव, नायर आणि कूपर रुग्णालयांसह 16 उपनगरीय रुग्णालयांमध्ये यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे. यामध्ये कालपासून 213 जखमींना उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला. तर आज शिवसेना उपनेते शिवसेना संलग्न संघटना समन्वयक भाऊ कोरगावकर व शिवसेना शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार शिव आरोग्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी के.ई.एम. रुग्णालयातील जखमींची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करून रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा दिला. तसेच शिवसेनेच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्याचे ठाम आश्वासनही दिले. के.ई.एम. रुग्णालय अधिष्ठाता डॉ. संगीता रावत व सीनियर एमओ डॉ. प्रवीण बांगर यांची भेट घेऊन रुग्ण उपचारासंबंधी चर्चा केली. के.ई.एम. रुग्णालयात 52 रुग्ण दाखल होते. यातील चार जणांवर इमर्जन्सी आर्थो सर्जरी करावी लागणार आहे. तर तीन जणांवर सर्जरी आवश्यक आहे. बाकी सर्व रुग्णांना प्रथमोपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
राजावाडीमधील जखमींची विचारपूस
घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात एकूण 11 जखमी दाखल झाले. यातील एका जखमीवर शस्त्रक्रियेची गरज आहे, तर इतर रुग्णांना उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला. राजावाडी रुग्णालयातील प्रमुख वैद्यकीय अधिकारी भारती राजुलवाला यांची भेट घेतली व रुग्णाच्या उपचारासंबंधी चर्चा केली. या वेळी शिव आरोग्य सेनेचे मुंबई संपर्क समन्वयक अमोल वंजारे, मुंबई सचिव ज्योती भोसले, रश्मी पेडणेकर, दर्शना पाटकर, जयेश पवार, दीपक गोपाळे, राजाभाऊ झगडे, जयदीप हांडे, मानाजी परब, प्रदीप मोगरे आदी उपस्थित होते.