
गेली कित्येक वर्षे विधानसभेचे कामकाज कसे चालते हे पाहण्यासाठी विधिमंडळात येत होतो. मात्र महाराष्ट्राच्या जनतेने मला संधी दिल्याने विधान भवनात आमदार म्हणून बसलो. त्याबद्दल या जनतेचे आभार मानत असून येत्या काळात नवा महाराष्ट्र आम्हाला घडवायचा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी आज शपथविधीनंतर दिली.
शपथविधीनंतर पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मी सर्वात आधी मित्रपक्षांचे आभार मानेन. मंत्रिमंडळाबाबत ज्येष्ठ नेते ठरवतील, जे काम आम्हाला दिले जाईल ते आम्ही करू. महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेऊ. सभागृहात तरुण चेहरे दिसले. योगेश कदम, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दिकी, रोहित पवार अशा तरुणांसोबत काम करताना मजा येईल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
– आदित्य ठाकरे मीडियाच्या केंद्रस्थानी
आदित्य ठाकरे यांचे विधान भवनात आगमन होताच फोटोग्राफर्स व टीव्ही चॅनेलच्या कॅमेरामननी यांच्या दिशेने धाव घेतली. त्याचवेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना पाहताच त्यांचे स्वागत केले आणि आलिंगन दिले.
– सुप्रिया सुळे-अजित पवार गळाभेट
काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार विधान भवनात आगमन झाले. मागील काही दिवसांत झालेल्या राजकीय घडामोडींमुळे अजित पवार सतत चर्चेत होते. अजित पवार दिसताच सुप्रिया सुळे पुढे आल्या आणि मागील काही दिवसांतील राजकीय घटना विसरून अजित पवार यांची गळाभेट घेतली.
























































