शिवसेनेनं ठरवलं तर आपल्या ताकदीवर सरकार बनवेल – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sanjay-raut

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आठवडा उलटून गेला सत्तास्थापनेचा दावा अद्याप करण्यात आलेला नाही. शिवसेनेना आपल्या भूमिकेवर ठाम असून जे लोकसभेवेळी ठरलं होतं तसंच व्हायला पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे. त्यातच शुक्रवारी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे. शिवसेनेनं मनात आणलं तर आपल्या ताकदीवर सरकार बनवू शकते, असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी आज पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केला आहे. दोन्ही पक्षांमध्ये अद्याप कोणतीही चर्चा सुरू नसल्याचंही त्यांनी यावेळी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

राज्यातील सत्तास्थापनेचं कोडं अद्याप सुटत नाही. त्यातच शिवसेनेच्या आमदारांनी काल राज्यपालांची भेट घेतली, संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटले त्यामुळे विविध चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर आज सकाळी संजय राऊत यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना खणखणीत उत्तरं दिली.

शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवा ही महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे. लोकसभेवेळी हॉटेल ब्लू सी मध्ये जे ठरंल होतं ते महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं होतं. ते जनते समोर ठरलं होतं, संपूर्ण मीडियाने ते देश आणि राज्याला दाखवलं होतं, त्यानुसारच काम व्हावं आणि शिवसेना-भाजपने एकत्र बसून सरकार चालवावं ही राज्याच्या जनतेची इच्छा आहे. ते विधानसभेत मिळालेल्या जनादेशातून स्पष्ट होत असल्याचे संजय राऊत सांगितले.

‘जर हा जनादेश मानण्यास कुणी नकार देत असेल आणि अशी कोणती गोष्ट झालीच नव्हती अशा प्रकारची गोष्ट समोर येत असेल तर आमच्याकडे, उद्धव ठाकरेंकडे कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही’, असे त्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितले.

आपल्या ट्वीट संदर्भात प्रश्न विचारल्यावर त्यांनी स्पष्ट केले की, मी जे वाक्य ट्वीट केले ते संपूर्ण विश्वासंदर्भातील आहे. त्याच्यात भाजपचे कुठेही नाव नाही. मला जे विचार आवडतात ते मी ट्वीट करतो. व्यक्ती, कुटुंब, संस्था कोणी असो अहंकारात बुडाल्यावर ते नष्ट होतात. हा इतिहास आहे, रामायण-महाभारत असो सर्वांनी त्यातून समजदार झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.

संजय राऊत आणि शरद पवार यांच्यात गुरुवारी झालेल्या भेटीने राजकीय आणि पत्रकारांच्या वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. त्यासंदर्भातही राऊत यांनी आज उत्तर दिलं. ‘शरद पवार यांना मी अधूनमधून भेटतो. ते नवीन नाही त्यावर अनेकदा टीका होते. पण ते या देशाचे अत्यंत अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत. अनेक दिवस त्यांना भेटलो नव्हतो. त्यांना भेटल्यावर अनेक गोष्टी शिकता येतात, समजून घेता येतात. राजकारणाविषयी, कृषीसंदर्भात शिकता येतं, असं सांगतानाच माझी ही सदिच्छा भेट होती, असं त्यांनी स्पष्ट केलं. पण सध्याचं राजकारण पाहता तुम्हाला जर शंका येत असतील तर त्या शंकांचं मी निरसन करणार नाही’, असंही ते म्हणाले.

काँग्रेसच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, ‘पाच वर्षांचा अनुभव बघता भाजपच्या हातात सत्ता जावी अशी त्यांची इच्छा नसणार. मात्र आमचा त्यांच्याशी कोणताही संपर्क नाही. असं असलं तरी मी इतकं सांगेन की, जर शिवसेनेनं ठरवलं तर बहुमत मिळवू शकते’.

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आमची चर्चा सुरू असल्याचे उद्धव ठाकरे बोलल्याची माहिती साफ चुकीची असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. असं कोणतंही विधान त्यांनी बैठकीत केलं नसल्याचे राऊत यांनी सांगितले.

जर उद्धव ठाकरे यांनी सांगितले असेल की राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल तर मी हे मानतो की, तुम्ही लिहून घ्या मुख्यमंत्री शिवसेनेचाच असले, असे त्यांनी सांगितले. आम्ही कोणाला भेटलो, यामध्ये तुम्ही जाऊ नका. शिवसेनेनं ठरवलं तर 2/3 संख्याबळाने आम्ही सरकार स्थापन करू शकू. म्हणून ज्यांच्याकडे बहुमत नाही त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा करण्याची हिम्मत करू नये, मोठी फजिती होईल, असा खणखणीत इशारा देखील राऊत यांनी यावेळी दिला.

बहुमत कुणाकडेच नाही तर सत्ता कोण आणि कशी स्थापणार या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, भाजप हा राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. जर त्यांनी दावा पेश केला आणि संविधानाच्या नियमांनुसार राज्यपाल साहेब त्यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देतील तर कायदेशीररित्या सरकार स्थापन करण्याचा त्यांचाच हक्क आहे, असंही त्यांनी सांगितलं.

आम्ही व्यापारी नाही!

भाजपकडून मंत्रिपदासंदर्भात नवा फॉर्म्युला आल्याची चर्चा आहे, असं म्हणत विचारलेल्या प्रश्नावर राऊत यांनी चपराक लगावणाऱ्या शब्दात उत्तर दिले. ‘आम्ही दुकान उघडून बसलेलो नाही. इथे ट्रेडिंग सुरू नाही. आमचे नेते, राजा, कार्यकर्ते हे व्यापारी नाहीत. त्यामुळे इथे व्यापाराची चर्चा होत नाही’.

भाजपने चर्चा सुरू का नाही केली?

शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू असल्याचं त्यांना कुणी सांगितलं. सगळ्यात पहिले भाजपने चर्चा सुरू करायला हवं होतं. 24 तारखेला जेव्हा निकाल आले तेव्हा त्यांचं कर्तव्य होतं की त्यांनी चर्चा सुरू करावी. महायुतीत आहात, मग का चर्चा सुरू का नाही केली. का नाही आलेत. काय प्रॉब्लेम आहे?, अशा खणखणीत शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडली.