धरणगाव पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेच्या सुरेखा पाटील बिनविरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । धरणगाव

धरणगाव येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या सुरेखा हिरालाल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे धरणगाव पंचायत समितीवर पुन्हा एकदा भगवा फडकला आहे. शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवा असा सल्ला देत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी नवनिर्वाचित सभापतींना शुभेच्छा दिल्या.

धरणगाव पंचायत समितीच्या सभापती पदासाठी सव्वा-सव्वा वर्षाचा कार्यकाळ ठरविण्यात आला होता. यानुसार विद्यमान सभापती मंजुषा पवार यांनी ठरल्यानुसार आपला राजीनामा दिला होता. यामुळे आज सभापती पदाची निवडणूक पिठासन अधिकारी तथा तहसिलदार सी. आर. राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पिंप्री गणातून शिवसेनेतर्फे निवडून आलेल्या सौ.सुरेखा हिरालाल पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची सभापती म्हणून बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. गटविकास अधिकारी ए डी जाधव, विस्तार अधिकारी गोपाल पाटील, अजय पाटील, गणेश पाटील आदींनी निवडणूक कामकाजास सहकार्य केले. यावेळी सभागृहात पंचायत समिती सदस्य मंजुषा पवार, जनाबाई कोळी, शारदा पाटील, प्रेमराज पाटील, मुकुंदराव नन्नवरे आदी उपस्थित होते.

पक्षीय बलाबल
धरणगाव पंचायत समितीत एकूण ६ सदस्यांपैकी शिवसेनेचे ५ व भाजपचा १ सदस्य आहेत. सव्वा वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर शब्दाला जागून मंजुषा सचिन पवार यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे झालेल्या रिक्त जागी नवीन सभापती पदाची निवडणूक घेण्याचे जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांना आदेशीत केले होते. सुरेखा पाटील या पिंप्री गणातील वराड येथील प्रतिष्ठित नागरिक शिवणारायण पाटील यांच्या स्नुषा आहेत.

सर्वसामान्यांच्या समस्या सोडवा- राज्यमंत्री गुलाबराव पाटील
अडचणीच्या वेळी धावून जाणे हिच शिवसेनेची ओळख आहे. धरणगाव पंचायत समिती मधील सत्तेच्या माध्यमातुन गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात. तसेच शासनाच्या सर्व योजना तालुक्यातील वंचित व गरजुंपर्यंत पोहचवाव्यात. तालुक्याच्या विकासासाठी सभापतीचे कार्य अनमोल असते, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी नवनिर्वाचित सभापतींना शुभेच्छा देताना केले.

निवड घोषित होताच सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सुरेखा पाटील यांचा बुके देऊन सत्कार केला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख गजानन पाटील, शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, गोपाल चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, माजी सभापती दीपक सोनवणे, उपनगराध्यक्ष विलास महाजन, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, महिला आघाडीच्या जनाताई पाटील, अ.भा.सु.क्ष.मराठा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष भानुदास पाटील, नांद्रा येथील माजी सरपंच प्रल्हाद पाटील, कृउबा संचालिका सिंधू पवार, भास्कर पवार, वराडचे उपसरपंच टिकाराम पाटील, गोकुळ पाटील, बबलू पाटील, नावलसिंग पाटील, चिंचपुरा येथील संतोष पाटील, नामदेव पाटील, तुकाराम पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या कार्यकत्र्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.