सोमय्यांनी घेतली बिल्डरांकडून सुपारी! अनिल परब यांचा घणाघाती आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

म्हाडा वसाहतीतील रहिवाशांना जादा एफएसआय मिळू नये म्हणून कारस्थान

वांद्रय़ातील सर्वसामान्यांच्या ‘म्हाडा’ वसाहतींना जादा ‘एफएसआय’ मिळू नये म्हणून भाजपच्या किरीट सोमय्या यांनी बिल्डरांकडून सुपारी घेतल्याचा घणाघाती आरोप आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अॅड. अनिल परब यांनी केला. ‘म्हाडा’च्या 56 वसाहतींमधील रहिवाशांना याचा फटका बसणार असून त्यांचे मोठय़ा घरांचे स्वप्न पूर्ण होणे कठीण बनणार आहे. मराठी माणसाच्या हक्कांवरच घाला घालण्याचा हा प्रकार असल्याची तोफही परब यांनी डागली.

वांद्रे पूर्व गांधीनगर कैलास को. ऑप हाऊसिंग सोसायटी लि. (इमारत क्र. 57) आणि रविकिरण को. ऑप. हाऊसिंग सोसायटी. लि. (इमारत क्र. 58) या दोन इमारतींमधील मोकळ्या जागेत अनिल परब यांनी अनधिकृतरीत्या कार्यालय थाटल्याचा आरोप करून सोमय्या यांनी शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बदनामी सुरू केली होती. मात्र हे कार्यालय आपले नसून सोसायटीने स्वतःच्या मर्जीने आणि स्वतःच्या सोयीसाठी सुरू केले होते. या ठिकाणी नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम केले जात होते. हे कार्यालय आपल्या मालकीचे नव्हते असे अॅड. अनिल परब यांनी वांद्रे येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. विशेष म्हणजे ‘म्हाडा’च्या नोटीसनंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रहिवाशांनी या कार्यालयाचे बांधकाम नियमित करण्यास ‘म्हाडा’कडे पाठपुरावा केला. मात्र सोमय्या यांनी ‘म्हाडा’, लोकायुक्तांच्या माध्यमातून दबाव आणल्यामुळेच ‘म्हाडा’ने बांधकाम नियमित करण्यास नकार दिल्याने रहिवाशांनी स्वतःच हे बांधकाम हटवले. त्यामुळे सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे आणि केवळ बदनामी करण्यासाठी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

घाबरणार नाही, पक्ष बदलणार नाही

नोटीसच्या नावाखाली मला घाबरवण्यासाठी हे सगळे उद्योग सुरू होते, असा दावा यावेळी अनिल परब यांनी केला. मात्र मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे. असल्या कारस्थानांना मी घाबरून पक्ष बदलणार नाही. मलाही कायदा कळतो. मात्र सोमय्या खोटे ठरल्याने त्यांना आता नाक घासावे लागेल, असेही ते म्हणाले.

शिवसैनिक ‘म्हाडा’वर धडकले

‘म्हाडा’च्या नोटीसनंतर रहिवाशांनी संबंधित कार्यालय स्वतःहून हटवले असताना ‘म्हाडा’कडून पुन्हा नोटीस देण्यात आली. त्यामुळे नाहक नोटीस देणाऱ्या ‘म्हाडा’ अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी अॅड. अनिल परब शिवसैनिकांसह ‘म्हाडा’वर धडकले. यावेळी शेकडोंच्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी ‘म्हाडा’ कार्यालयाच्या गेटवरच ठिय्या मांडत ‘म्हाडा’ प्रशासन आणि सोमय्यांचा निषेध केला. तब्बल तीन तास हे आंदोलन सुरू होते. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन खेरवाडी पोलीस ठाण्यात नेले.

सोमय्या यांचा ‘म्हाडा’वर दबाव

वांद्रे येथील या ‘म्हाडा’च्या वसाहती 1960 पासूनच्या आहेत. या इमारती आता गृहनिर्माण सोसायटी झाल्या आहेत. या ठिकाणचे कार्यालय अनधिकृत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर ‘म्हाडा’ने नोटीस बजावल्यानंतर त्याला रीतसर उत्तरही देण्यात आले. ही जागा आपली नसून सोसायटीच्या मालकीची असल्याचे कळवल्यानंतर ‘म्हाडा’ने बजावलेली नोटीस मागेही घेण्यात आली होती. ही जागा नियमित होऊ नये यासाठी सोमय्या यांनीच ‘म्हाडा’वर दबाव आणल्याचा आरोप अॅड. अनिल परब यांनी केला. नारायण राणे यांच्या घरातील बेकायदा बांधकामावर झालेली कारवाई पाहण्यासाठी सोमय्या आपल्यासोबत येणार का, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

अब्रुनुकसानीचा 100 कोटींचा दावा ठोकला

संबंधित कार्यालयाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे ‘म्हाडा’नेच सांगितल्याने सोमय्या यांचे आरोप खोटे ठरले आहेत. गेल्या दीड-दोन वर्षांपासून मी हेच सांगत होते. त्यामुळेच सोमय्यांविरोधात अब्रुनुकसानीचा 100 कोटींचा दावा ठोकला असल्याची माहिती परब यांनी दिली. सोमय्या आता तोंडावर आपटल्यामुळे त्यांना नाक घासावे लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

‘म्हाडा’ अधिकाऱ्यांना धारेवर धरले

या कॉलनीतील किती बेकायदा बांधकामाबाबत ‘म्हाडा’ने कारवाई केली याची माहिती देऊ शकता? असा सवाल करीत अनिल परब यांनी ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. बेकायदा बांधकामाबाबत न्यायालयाचे आदेश येऊनही कारवाई झालेली नसल्याचे त्यांनी उदाहरणच यावेळी दिले. त्यांच्यावर कारवाई करीत नाही, ते तुमचे जावई लागतात का, असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी केला.

गरीबांच्या घरावर वरवंटा फिरू देणार नाही

गरीबांच्या पोटावर किरीट सोमय्या येत असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटून याबाबत चर्चा करणार असल्याचे परब यांनी स्पष्ट केले. राजकारणासाठी गरीबांच्या घरावर वरवंटा फिरू देणार नाही. शिवसेना गोरगरीबांच्या पाठीशी ठाम असून वेळ पडल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून लढा देईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. गोरगरीबांच्या घरावर कारवाई करण्यासाठी ‘म्हाडा’, भाजपने सोमय्यांना नेमले आहे काय, असा सवालही त्यांनी यावेळी केला आणि ही कारवाई झाल्यास ‘म्हाडा’, सोमय्या आणि भाजप याला सर्वस्वी जबाबदार राहील, असेही ते म्हणाले.

आठ दिवसांत उत्तर द्या, नाहीतर हक्कभंग आणणार

मूळ आराखडय़ाबाहेर केलेल्या बांधकामाला अनधिकृत बांधकाम समजले जाते. मात्र संबंधित इमारतींच्या बांधकामाचा मूळ आराखडाच ‘म्हाडा’ कार्यालयाकडे नसल्याचा गंभीर प्रकारही आमदार परब यांनी उघड केला. त्यामुळे संबंधित बांधकाम अनधिकृत कसे ठरवले असा सवालही परब यांनी केला. हा आराखडा तपासून पाहतो असे ‘म्हाडा’ कार्यालयाकडून सांगण्यात आले. मात्र जर पुढील आठ दिवसांत जर मूळ बांधकामाचे नकाशे मला मिळाले नाही तर मी ‘म्हाडा’वर हक्कभंग दाखल करीन, असा इशाराही अॅड. परब यांनी यावेळी दिला. शिवाय दबावाखाली केवळ छळ म्हणून हा प्रकार सुरू आहे. मात्र या कारवाईविरोधात न्यायालयाच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई करेन असेही त्यांनी स्पष्ट केले.

असा आहे सोमय्यांचा डाव

‘एलआयजी’ (लोअर इन्कम ग्रुप) साठीच्या जागेवर ही घरे आहेत. ‘म्हाडा’ वसाहतींच्या इमारतींमध्ये 220 चौरस फुटांचे रूम आहेत.  इमारतींच्या आवारात आणि रूमच्या आजूबाजूला असणाऱ्या मोकळ्या जागा, छोटी वाढीव बांधकामे, व्हराडय़ांमुळे रहिवाशांना पुनर्विकासात वाढीव ‘एफएसआय’ मिळणार आहे. त्यामुळे पुनर्विकास करणाऱ्या बिल्डरचे नुकसान टाळण्यासाठी ‘म्हाडा’कडून संबंधित कार्यालयाला आलेल्या नोटीसचा वापर रहिवाशांना ‘ब्लॅकमेलिंग’साठी आणि घाबरवण्यासाठी केला जाण्याचा डाव असल्याचे परब यांनी स्पष्ट केले.सोमय्या यांच्या या भूमिकेला भाजपचा पाठिंबा आहे का, असा सवालही परब यांनी उपस्थित केला.

शिवसैनिकांचा रुद्रावतार पाहून सोमय्यांची तंतरली

पाडण्यात आलेल्या कार्यालयाच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी जाणीवपूर्वक भेट देण्याचे सोमय्यांनी जाहीर केले. ही बाब शिवसैनिकांपर्यंत पोहोचताच त्यांच्या संतापाचा भडका उडाला. या ठिकाणी जमलेल्या शेकडो शिवसैनिकांनी घोषणाबाजी करीत सोमय्यांचा निषेध केला. त्यांचे ‘शिवसेना स्टाईल’ स्वागत केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. शिवाय हिंमत असेल तर या ठिकाणी येऊनच दाखवावे, असे आव्हानच देण्यात आले. शिवसैनिकांचा रुद्रावतार पाहून ‘बीकेसी’पर्यंत आलेले सोमय्या आल्यापावली परत गेले.

‘त्या’ जागेशी परब यांचा कोणताही संबंध नाही – म्हाडा

वांद्रे पूर्व येथील या इमारतींच्या मोकळ्या जागेत करण्यात आलेल्या बेकायदेशीर अनधिकृत बांधकामाबाबत ‘म्हाडा’ कार्यालयातील नस्तींचे अवलोकन केले असता सदर बांधकामाशी अनिल परब यांचा कोणताही संबंध आढळून येत नाही. त्यामुळे ‘म्हाडा’ कार्यालयाकडून अनिल परब यांच्या नावे जारी केलेली नोटीस मागे घेण्यात आल्याचा लेखी खुलासा ‘म्हाडा’ने आज केला आहे. याबाबत ‘म्हाडा’ने परब यांना लेखी उत्तर दिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)