रुग्णालयांच्या खासगीकरणाला शिवसेनेचा विरोध; तीन नवीन अद्ययावत रुग्णालये पालिकेने चालवण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम उपनगरातील सिद्धार्थ रुग्णालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि हरिलाल भगवती रुग्णालय ही तीनही अत्याधुनिक रुग्णालये आता लोकार्पणासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहेत. मुंबईकरांना दर्जेदार, परवडणारी आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यातील आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही रुग्णालये महापालिकेने चालवावीत, अशी मागणी शिवसेनेने आज केली. नवीन रुग्णालये खासगी संस्थेला चालविण्यास देण्याला शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे.

महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालय, कांदिवली पश्चिम येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय (शताब्दी रुग्णालय) आणि बोरिवली पश्चिम येथील हरिलाल भगवती महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आदी रुग्णालयांना भेट दिली. तसेच, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी माजी आमदार विलास पोतनीस, उपनेते विनोद घोसाळकर, नगरसेवक अंकित प्रभू, साईनाथ दुर्गे, सारिका झोरे, माजी नगरसेवक उदेश पाटेकर आदी उपस्थित होते.

यावेळी किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आम्ही भूमिपूजन केलेल्या ३ रुग्णालयांच्या नवीन इमारती बांधण्याची कामे अंतिम टप्प्यात आहेत. ८० ते ८५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. आता केवळ नवीन रुग्णालय इमारतींच्या हस्तांतरणाची प्रक्रिया बाकी आहे. सुमारे ५०० कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या रुग्णालयांचे तातडीने लोकार्पण होणे गरजेचे आहे. त्यामुळे मुंबईतील केईएम, नायर आणि सायनसारख्या प्रमुख रुग्णालयांवरील वाढता ताण कमी होणार आहे. अत्याधुनिक सुविधा, सुसज्ज मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स आणि आधुनिक वैद्यकीय यंत्रणांनी नवीन रुग्णालये सज्ज झाली आहेत.

सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासन संगनमताने सार्वजनिक आरोग्यसेवेचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. महापालिकेकडे सक्षम डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक कर्मचारी आणि आरोग्य व्यवस्थापनाचा अनेक दशकांचा अनुभव आहे. पालिकेच्या रुग्णालयांचे यशस्वी संचालन महापालिका करत आहे. त्यामुळे सिद्धार्थ रुग्णालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि हरिलाल भगवती रुग्णालय यांचेही संचालन पालिकेने स्वतः करावे, अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी केली.