दुष्काळग्रस्तांसाठी शिवसेनेचा मदतयाग, उद्धव ठाकरे आज मराठवाड्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav thackeray

सामना प्रतिनिधी । मुंबई

पावसाने धोका दिल्यामुळे यंदा संपूर्ण राज्य दुष्काळाच्या मगरमिठीत सापडले आहे. मराठवाड्यातील शेतशिवारात दुष्काळवणवा पेटला असून दोन घासाच्या भ्रांतीने शेतकरी चिंताक्रांत झाला आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात शिवसेनेने मदतयाग सुरू केला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या बीड व जालना जिल्हय़ांतील शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.

उद्धव ठाकरे यांचे विशेष विमानाने सकाळी संभाजीनगर येथे आगमन होणार असून येथून हेलिकॉप्टरने ते बीडकडे रवाना होणार आहेत. बीड तालुक्यातील म्हाळसजवळा येथे सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना पशुखाद्याचे वाटप करण्यात येणार असून त्यानंतर ते दुष्काळी भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर बीड येथे सकाळी 11 वाजता आशीर्वाद लॉन्सवर होणाऱ्या शेतकरी मेळाव्यास उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील.

बीड येथील सभा आटोपून संभाजीनगरला परत येताना उद्धव ठाकरे हे जालना व बदनापूर येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. अंबड चौफुलीवर मातोश्री लॉन्स येथे दुपारी 2 वाजता तर बदनापूर येथे चाणक्य मंगल कार्यालयात दुपारी 3 वाजता ते शेतकऱ्यांशी संवाद साधतील.