वाजतगाजत… प्रचंड जल्लोषात आणि उत्साहात शिवसेनेच्या ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या मार्गात अनेक प्रकारे खोडा घालणाऱ्या ‘खोकासुरां’ना न्यायालयाने दणका दिल्यानंतर लटके यांनी ‘महाविकास आघाडी’कडून प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. गद्दार शिंदे गटाला धडा शिकवण्यासाठी आणि भाजपच्या कपटावर मात करण्याचा निश्चय यावेळी शिवसैनिकांनी केला. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके यांनी गुंदवली येथील निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यासाठी जाणाऱ्या लटके यांना पाठिंबा देण्यासाठी केवळ शिवसैनिकच नव्हे, तर महाविकास आघाडीचे कार्यकर्तेही शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. गणेश मंदिर, मालपा डोंगरी या ठिकाणाहून महाविकास आघाडीच्या रॅलीची सुरुवात झाली. टप्प्याटप्प्यावर शेकडोंच्या संख्येने शिवसैनिक रॅलीत सहभागी झाले.  दरम्यान, भाजपच्या वतीने या निवडणुकीसाठी माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर शिवसेनेकडून माजी नगरसेवक संदीप नाईक यांनी ‘बी’ फॉर्म भरला. यावेळी शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते विभागप्रमुख अनिल परब, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, सरचिटणीस चरणसिंग सप्रा आदी उपस्थित होते. या निवडणुकीसाठी आणखी दोन अपक्ष आणि दोन पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

पालिकेकडून सकाळीच राजीनामा मंजूर

न्यायालयाने पालिकेला दणका दिल्यानंतर आज सकाळीच ऋतुजा लटके यांच्याकडे पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून राजीनामा मंजूर केल्याचे पत्र देण्यात आले. लटके यांनी सकाळी 10 वाजताच पालिका मुख्यालयात येऊन हे पत्र स्वीकारले.