
नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शिवसेना सर्व प्रकारची कायदेशीर मदत पुरवणार आहे. आंदोलकांचे खटले शिवसेना विनामूल्य लढणार असल्याची ग्वाही शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली. राज्यातील वकिलांनीही याकामी विद्यार्थ्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
आदित्य ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिल्लीच्या जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष लाठीमार आणि मुंबईच्या चैत्यभूमी परिसरातील आंदोलकांवरील पोलिसांच्या दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवला. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून मुंबईतही लोकांनी उत्स्फूर्तपणे चैत्यभूमी येथे रस्त्यावर उतरून आंदोलन केले. पण तिथूनही पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने गाडय़ांमध्ये भरून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये नेले. त्यातील अनेक लोक अल्ववयीन होते आणि तरीही त्यांना बेकायदा अटक केली गेली. त्यांच्या मदतीसाठी सागर देव्हारे, नगरसेवक साईनाथ दुर्गे, निशिकांत शिंदे, आमदार महेश सावंत, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, सिद्धेश शिंदे हे शिवसैनिक धावून गेले, असे त्यांनी सांगितले.
आज पोलिसांनी पुन्हा त्या आंदोलकांना नोटीस पाठवून त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केले. त्या सर्वांना शिवसेनेकडून कायदेशीर मदत पुरवली जाईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
इथे संपर्क करा…
आंदोलनात उतरणारे तरुण, विद्यार्थी व नागरिकांच्या पाठीशी शिवसेना उभी राहील. आंदोलन केल्यामुळे त्यांना काही कायदेशीर नोटीस आली, एफआयआर झाला तर त्यांना कायदेशीर मदत दिली जाईल. त्यासाठी [email protected] हा ई-मेल आयडी बनवला गेला आहे. यावर संपर्क करा, शिवसेना सोबत राहील, असे आदित्य ठाकरे म्हणाले.





























































