
मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर येथे एका 64 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्र. 9 च्या महिला आघाडीच्यावतीने ट्रॉम्बे पोलीस ठाण्यासमोर गुरुवारी जोरदार आंदोलन करण्यात आले.
विभाग क्रमांक 9 चे विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॉम्बे पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आले. शिवसेना महिला आघाडीच्यावतीने सहाय्यक पोलीस आयुक्तांना यावेळी निवेदन देण्यात आले. सदर गुह्याची एफआयआर कॉपी मिळावी, फास्टट्रक कोर्टमध्ये हा खटला चालवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, राज्य महिला आयोगाला यासंदर्भात अवगत करून शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ पीडितेला मिळवून द्यावा, विभागात निर्भया पथकाची गस्त जास्तीत जास्त वाढवून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करावा आदी मागण्या शिवसेना महिला आघाडीच्यावतीने करण्यात आल्या. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांनी दिला.
शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, संजना घाडी, शिवसेना सचिव सुप्रदा फातर्पेकर, विभागसंघटक पद्मावती शिंदे, प्रज्ञा सकपाळ, राजराजेश्वरी रेडकर, रंजना नेवाळकर, माजी नगरसेविका निधी शिंदे, नीलम डोळस, दीपाली गोसावी, वत्सला पाटील, मदिना खान, मीना शिंपी, धन्वंतरी सोनावडेकर, पुष्पा थवई, दक्षता पाताडे, अनिता महाडिक, योगिता म्हात्रे, मालती शेंडगे, स्वाती दबडे यांच्यासह आमदार प्रकाश फातर्पेकर, शीव विधानसभाप्रमुख गोपाळ शेलार, निमिष भोसले, संजय नटे, राजेंद्र पोळ, सुरेश लांडगे, शशिकांत पाटील, संदीप भोईर, मनोहर नायडू, अविनाश शेवाळे, किसन टिकेकर, उमेश करकेरा, रोहिदास ढेरेंगे, विजय भोईर, दीपेश चव्हाण, राजेश दौडकर आदी यावेळी उपस्थित होते.
फडणवीसांनी राजीनामा द्यावा
इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित आहे. मुंबईत रात्री 12 वाजता देखील मुली सुरक्षितपणे फिरू शकतात, असे विधान बुधवारी हिवाळी अधिवेशनादरम्यान गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मात्र, महिलांना सुरक्षा देण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सपशेल अपयशी ठरल्यामुळे ‘देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या’, अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी शिवसैनिकांतर्फे करण्यात आली.
























































