हिंमत असेल तर एक निवडणूक मतपत्रिकेवर घेऊन दाखवा! उद्धव ठाकरे यांचे थेट आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळाले आहे. मात्र संपूर्ण वातावरण आणि एक्झिट पोलचे अंदाज विरोधात असताना, निकाल उलटेपालटे लागले असून भाजपला इतके मोठे यश कसे मिळाले याबाबत मतदार प्रचंड संभ्रमात आहेत. त्यामुळे भाजपची इतकी लाट असेल आणि हिंमत असेल तर केवळ लोकसभेची देशभर पिंवा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मतपत्रिकेवर घेऊन दाखवा, असे थेट आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपला दिले. किमान सिनेटची निवडणूक तरी घ्या, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक प्रचारात हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्याबद्दल सहा वर्षांसाठी मतदान आणि निवडणुकीवर बंदी घालणारा निवडणूक आयोग भाजपच्या नेत्यांकडे दुर्लक्ष का करतो, असा सवाल उपस्थित करीत ‘आम्हीदेखील धर्माच्या नावाने मते मागू’, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

शिवसेनेच्या नरीमन पॉइंट येथील ‘शिवालय’ या राज्य संपर्क कार्यालयाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मुंबईसह देशातील विविध प्रश्नांना वाचा पह्डली. देशात नुकत्याच पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीत भाजपला तीन ठिकाणी यश मिळाले. यावर उद्धव ठाकरे यांनी सडेतोड मत मांडले. या यशाबद्दल भाजपचे अभिनंदन. मात्र सर्व परिस्थिती भाजपच्या विरोधात असताना अंतिम निकाल भाजपच्या बाजूने कसे लागले यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजपच्या धार्मिक प्रचारावरही त्यांनी तोफ डागली. ते म्हणाले, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणुकीच्या प्रचारात हिंदुत्व आणि राम मंदिराचा मुद्दा घेतला होता. तेव्हा निवडणूक आयोगाने शिवसेनाप्रमुखांना मतदान आणि निवडणूक लढवण्यासाठी सहा वर्षांची बंदी घातली. मात्र पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटकच्या निवडणुकीत थेट ‘बजरंग बली की जय’ म्हणून मतदान करण्याचे आवाहन केले, तर गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेशात मोफत रामलल्लाच्या दर्शनाचे आमिष दाखवले. त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडून झालेले प्रकार गुन्हा ठरत नाहीत का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. याबाबत आपण निवडणूक आयोगाला पत्र दिले असून धर्म, देवाच्या नावाने मते मागितली तर गुन्हा होतो का, असा सवाल केला आहे. मात्र याचे अद्याप उत्तर आलेले नाही. त्यामुळे निवडणुकीआधी याचे उत्तर आले नाही तर आम्हालाही धर्म, देवाच्या नावाने मते मागण्याचा अधिकार आहे असे समजायचे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे येणाऱया निवडणुकीत आम्ही ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हरहर महादेव’, ‘गणपती बाप्पा’ मोरया’ म्हणत आणि धर्माचे प्रश्न उघडपणे मांडले तर आमच्यावर तुम्हाला कारवाई करता येणार नाही, असा इशाराही त्यांनी निवडणूक आयोगाला दिला.

शेतकऱयांना कर्जमुक्त करा

दुष्काळ आणि अवकाळीमुळे राज्यातील शेतकरी मेटाकुटीला आला असून त्याची दैन्यावस्था झाली आहे. मात्र सरकारला शेतकऱयांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. नुकसानीचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत.पीक विमा मिळत नाही. विमा पंपन्यांचे दरवाजे ठोठावूनही लक्ष दिले जात नाही. त्यामुळे बेजबाबदार सरकारमुळे शेतकऱयाची अवस्था वाईट झाली आहे. त्यामुळेच ‘सरकार आपल्या दारी’चा गाजावाजा केला जात असताना सरकारला कुणी दारात उभे करायला तयार नाही, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला. महाविकास आघाडीच्या काळातील नागपूर येथील एकमेव अधिवेशनात आपण मुख्यमंत्री असताना जाचक निकष बाजूला ठेवून शेतकऱयांची दोन लाखांपर्यंतच्या कर्जातून मुक्तता केली होती. यानंतरही शेतकऱयांना मदत केली. त्यामुळे शेतकरी तग धरून होता. मात्र या सरकारच्या काळात शेतकऱयाच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढत आहे. विमा पंपन्या दार ठोठावूनही ऐकत नाहीत. बँका वसुलीसाठी तगादा लावत आहेत. त्यामुळे बळीराजाला वाचवण्यासाठी थोतांडे बंद करून सरकारने बळीराजाला तातडीने कर्जमुक्ती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकऱयांना दिलासा देण्यासाठी आपण शिवसैनिक, पदाधिकाऱयांना आदेश देऊन जिल्हाधिकाऱयांना जाब विचारण्याचे निर्देश दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईत येणाऱया कुणालाही हे शहर उपाशी राहू देत नाही. मुंबईकर कष्ट उपसत असल्यामुळे उद्योगधंदे उभे राहत आहेत. असे असताना मुंबईतील उद्योग गुजरातला पळवण्याचे कारस्थान सुरू आहे. हे असेच सुरू राहिले तर मुंबईकरांनी काय करायचे? मुंबईचा उकिरडा करायचा आहे का?