निखाऱ्यावरून चालताना चटके बसणारच, आम्हाला त्याची चिंता नाही -भास्कर जाधव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाण्यात झालेल्या महाप्रबोधन यात्रेत प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप ठेवत शिवसेना नेते विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार भास्कर जाधव यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही केलेल्या भाषणात कोणते चिथावणीखोर वक्तव्य होते, याचा तपास केल्याशिवाय गुन्हा दाखल करता येत नाही. मात्र, तरीही गुन्हा दाखल झाला असेल तर आम्ही त्याला कायदेशीर उत्तर देऊ, असे भास्कर जाधव म्हणाले.

शिवसेनेसाठी काम करायचे म्हणजे निखाऱ्यावरून चालावे लागते, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे निखाऱ्यावरून चालत असताना चटके बसणारच आहेत. आम्हाला त्याची फार काही चिंता नाही. तेव्हा जे भाषण झाले, त्यामध्ये काय चिथावणीखोरपणा आहे, याचा तपास केल्याशिवाय गुन्हा दाखल करता येत नाही. तरीदेखील त्यांनी असा काही गुन्हा दाखल केला असेल, तर आम्ही त्याला कायद्याने उत्तर देऊ. आता महाराष्ट्रात गद्दारीच्या विरोधात जो राग निर्माण झाला आहे. जो आगडोंब उसळला आहे, तो अशा प्रकारचे गुन्हे दाखल करून थांबणार नाही, असेही भास्कर जाधव यांनी ठणकावले.

आमच्यातील काही ठराविक लोकांवर गुन्हे दाखल करून हा वणवा विझणार नाही. हा विचारांचा वणवा दिवसागणिक वाढत जाईल. त्यामुळे असे गुन्हे दाखल करताना त्यांनी काही विचार करणे गरजेचे आहे. आज त्यांच्या बाजूला असलेले लोक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात काही-बाही बोलत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात समन्यायी प्रमाणात न्याय दिला पाहिजे, अशी मागणीही भास्कर जाधव यांनी केली.