
आपण 17 तारखेला महाविकास आघाडीतर्फे मोर्चा काढणार आहोत. महाराष्ट्रप्रेमींचा महाराष्ट्र द्रोहींच्या विरोधात हा मोर्चा असणार आहे. राजकारण म्हटल्यावर सभा, मोर्चे, आंदोलने होतात. मात्र महाराष्ट्राची जी अवहेलना होत आहे. त्याविरोधात हा मोर्चा आहे. फुले, शाहू, आंबेडकर आणि शिवाजी महाराजांचा अपमान करणारा माणूस आज राज्यपाल पदावर बसला आहे. तोच माणूस आज पंतप्रधानांच्या व्यासपीठावर बसला होता. मग महाराष्ट्राने काय करायचं? सीमाप्रश्न पेटलेला असताना महाराष्ट्राच्या बाजूने कोणीच बोलत नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री अतिशय माज आल्यासारखे बोलत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची जशी महाराष्ट्र वाट पाहत आहे, तशी ती कर्नाटकने देखील बघायला हवी. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरु असताना तुम्ही बेळगावला उपराजधानीचा दर्जा देत आहात. डोक्यावरून पाणी गेलं तरी आपण शांत बसलो आहोत. केंद्रात भाजपचं सरकार आहे. कर्नाटकात भाजपचं सरकार आहे. आणि महाराष्ट्रात भाजपचे मिंधे आहेत. बोम्मई ज्याप्रमाणे बोलतात त्याप्रमाणे आपले मुख्यमंत्री का बोलत नाहीत? महाराष्ट्राला कोणी वाली आहे की नाही? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. रविवारी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा मातोश्री निवासस्थानी शिवसेनेत पक्षप्रवेश झाला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे खासदार अमित शहांना भेटायला गेले होते. तेथे देखील बोम्मई म्हणतात की मी अमित शहांच ऐकणार नाही. पण अशावेळी पंतप्रधान महाराष्ट्राच्या बाजूने काही बोलणार आहेत की नाही? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना काही समाज देणार आहात की नाही? आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने तुम्ही महामार्ग तयार केलात पण दुरीकडे कर्नाटक आपल्याला धमकावत आहे. म्हणुनंच येत्या 17 तारखेला या सर्व घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचा मोर्चा आहे.
गेले 2 ते 4 महिने मातोश्री असो किंवा शिवसेना भवन असो रोज कुणाचा तरी प्रवेश शिवसेनेत होत आहे. एका त्वेषाने, विचाराने आणि जिद्दीने हे प्रवेश होत आहेत. तुमचा आणि आमचा तसा काय संबंध होता? सत्ता असताना तुम्ही आला असतात तर जिथे सत्ता असते तिथे सगळे जातात असं म्हटलं गेलं असतं. सत्यनारायण वेगळा भाग पण हल्ली सत्तानारायण झालं आहे. काही जणांना सत्तानारायण भावतो. काही जणांना वाटते शिवसेना संपली. आम्ही म्हणजेच शिवसेना होतो आणि आम्ही शिवसेना संपवली असे जयांना वाटते ती लोकं संपली आहेत फक्त ते जगजाहीर होणं बाकी आहे. मी म्हणजेच शिवसेना मी नसतो तर काही झालाच नसतं असं काही नसतं. कारण कोण्या एका व्यक्तीवर जग अवलंबून नसतं. आज पंतप्रधानांनी महाराष्ट्रात विकासकामांचं लोकार्पण केलं. कोणी तरी म्हणालं की हे मीच केलं पण सरकार येत जात असतं. मी म्हणजेच सगळं हा काहीजणांचा समज झाला आहे. मात्र हा समज आपल्याला मोडायचा आहे. इतके दिवस आपण त्यांना ठाणे सांभाळायला दिलं होतं. मात्र आता ठाणे आपल्याला ठाणे पुन्हा उभं करायचं आहे. त्या दृष्टीने आपण वाटचाल करू. असे उद्धव ठाकरे म्हणाले.






























































