ड्रग्ज प्रकरणात भुसेंसह दोन मंत्री, ससूनच्या डीनची नार्कोटेस्ट करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ससून रुग्णालयाबाहेर सापडलेल्या ड्रग्स प्रकरणात मंत्री दादा भुसे यांच्यासह इतर दोन मंत्री, आमदार आणि संघटनात्मक पातळीवरील पदाधिकाऱयांची नावे समोर येतील, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केला. यासाठी ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांची नार्कोटेस्ट करावी. त्यानंतर सत्य समोर येईल. आम्ही सरकारला नऊ दिवसांचा अल्टिमेटम देत असून, 24 ऑक्टोबरनंतर महाविकास आघाडी रस्त्यावर उतरून लढा देईल, असेही अंधारे यांनी यावेळी सांगितले.

ससून रुग्णालयाबाहेर सापडलेल्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा ससूनमधून पसार झाला असून, अद्यापि पोलिसांना सापडलेला नाही. याबाबत सुषमा अंधारे, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती देऊन तपासात होत असलेल्या दिरंगाईबाबत टीका केली.

सुषमा अंधारे म्हणाल्या, ड्रग्जतस्कर ललित पाटील फरारप्रकरणी ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर, रोझरी स्कूलचे संस्थापक विनय अरहना, त्यांचा वाहनचालक दत्ता डोके आणि ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील यांना सहआरोपी करून त्यांची नार्कोटेस्ट करण्यात यावी. त्यानंतर सत्य समोर येईल. जिह्यात तीनशे-साडेतीनशे कोटी रुपयांची ड्रग्जनिर्मिती होणारे कारखाने उभे राहतात, ही बाब नाशिकचे पालकमंत्री असूनही दादा भुसे यांच्या लक्षात आली नाही का? या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. अनिल जयसिंघानी, डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यासारखेच हे प्रकरण थंड पाडायचे आहे का, अशी टीका त्यांनी केली. रवींद्र धंगेकर म्हणाले, ड्रग्ज प्रकरणात जेलमधील अधिकारी, ससून रुग्णालयातील डॉक्टर यांच्याकडे संशयाची सुई असताना गृह, आरोग्य विभाग शांत आहे. यामध्ये सगळ्यांचे हात बरबटलेले आहेत.

मंत्री महाजन यांचा वरदहस्त

ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकुर यांच्यावर राज्यातील मंत्री गिरीश महाजन यांचा वरदहस्त असल्याचा आरोप यावेळी सुषमा अंधारे यांनी केला. तर, या प्रकरणात भाजपच्या एका मंत्र्याचा हात असल्याची शक्यता असून पोलीस तपासात ही बाब समोर येईल, असा आरोप आमदार धंगेकर यांनी केला. त्यावेळी त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही.