सामना प्रतिनिधी । मुंबई
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पबाधित भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य मिळालेच पाहिजे, या मागणीसह इतर मागण्यांसाठी तारापूर येथे स्थानिकांनी जोरदार आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने थेट अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांच्या कार्यालयावर धडक दिली. शिवसेनेचा बुलंद आवाज आणि दणक्याने या सीएमडीची बोलतीच बंद झाली. येत्या पंधरा दिवसांत प्रकल्पबाधितांच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा आणि त्यानंतर उसळणाऱया जनप्रक्षोभाला न्युक्लियर पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड जबाबदार राहील, असा इशाराही या वेळी देण्यात आला.
तारापूर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना सचिव, खासदार आणि स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस अनिल देसाई आणि शिवसेना उपनेत्या तसेच मुंबई महापालिकेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्या नेतृत्वाखाली अणुऊर्जा प्रकल्पाचे सीएमडी एस.के. शर्मा यांची त्यांच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील कार्यालयात भेट घेतली. या वेळी न्युक्लियर पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक (एचआर) नगाईच आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिष्टमंडळात स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे उपाध्यक्ष अनिल चव्हाण, दिनेश बोभाटे, प्रवीण महाले, एनपीसीआयएल स्थानीय लोकाधिकार समितीचे कार्याध्यक्ष जितेंद्र देशमुख (तारापूर), ललित राऊत, नीलेश जगताप, जयवंत राऊळ, प्रकाश तामोरे, तुषार पाटील, प्रमोद पाटील, गणेश कोरे, हरेश कोरे, अजित पाटील, स्थानीय लोकाधिकार समिती ट्रॉम्बेचे कार्याध्यक्ष नरेश तामोरे, सहकार्याध्यक्ष दशरथ गांधी, सरचिटणीस ललित साने आदींचा समावेश होता.
सीएमडींची थातूरमातूर उत्तरे आणि शिवसेनेचा बाणा
आपली सोन्यासारखी जमीन देशभावनेने देऊनही प्रकल्पग्रस्तांची फरपट सुरू आहे. पाणी, शाळा, हॉस्पिटल अशा सुविधा देऊ, असे कबूल करूनही त्यांना यातील कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही. इतकेच नव्हे तर अनुकंपा तत्त्वाखाली मिळणाऱया नोकरीत १९९२ पासून प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्कांपासून दूर ठेवले आहे. यावर सीएमडी शर्मा यांनी थातूरमातूर उत्तरे देण्यास सुरुवात केली. हे पाहून अनिल देसाई आणि विशाखा राऊत यांनी शिवसेना स्टाईलने आवाज वाढवून व्यवस्थापनावर प्रश्नांचा भडीमार केला आणि त्यांची पुरती भंबेरी उडवून दिली.
प्रमुख मागण्या
– नुकतीच झालेली टेक्निशियनची भरती रद्द करून नवीन भरती प्रक्रिया सुरू करावी.
– पंधरा दिवसांपूर्वी बोईसर येथे झालेल्या प्रक्षोभास जबाबदार वर्मा यांची तातडीने बदली करावी.
– अनुकंपा तत्त्वाखाली शिल्लक असलेल्या व्यक्तींना नोकरीत ताबडतोब सामावून घ्यावे.
– सीएमडी आणि सर्व डायरेक्टर यांनी ताबडतोब अक्करपट्टी, पोफरन आणि घेवली या गावाला भेट देऊन त्यांच्या हालअपेष्टांची जाणीव करून घ्यावी.

























































