शिवसेनेकडून कोल्हापुरात लोढांविरुद्ध तक्रार, पोलिसांचा तक्रार दाखल करून घेण्यास नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मिंधे गटाच्या गद्दारीची शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना केल्याचं वक्तव्य केलं. या विधानावर संतापाची लाट उसळली आहे.

सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान वारंवार होत असल्याने आज कोल्हापुरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून लोढा यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याने वातावरण तंग झालं.

मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात गुरुवारी कोल्हापुरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, रविकरण इंगवले यांच्यासह शिवसैनिक आले. यावेळी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पीआय कटकधोंड यांना निवेदन देत जिल्हा प्रमुखांनी तक्रार नोंद करण्याची मागणी केली.

मात्र, तक्रार नोंद न करता निवेदनाची पोच देण्यास पोलिसांनी तयारी दर्शवली. यामुळे येथे शिवसैनिक आणि पोलीस यांच्यामध्ये वाद झाला आणि शिवसैनिकांनी पोलीस स्टेशन बाहेरच घोषणाबाजी करत मंगल प्रभात लोढा आणि पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. गुरुवारी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असून त्यांना भेटून सदर निवेदन देण्यास दोन्ही जिल्हाप्रमुख व शिवसैनिक हे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे रवाना होत होते. मात्र, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सदर तक्रार नोंद करून घेत सातारा पोलिसांकडे वर्ग करण्यास सांगितले.