शिवसेनेचा तहसील कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। पालम

दीड वर्षांपासून संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान मंजूर होऊनही लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाकडून अनुदान देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे शिवसेनेने तहसील कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे. खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवेदनाद्वारे हा इशारा देण्यात आला आहे.

संजय गांधी श्रावणबाळ योजनेतील दीड हजार लाभार्थ्यांची मागील दीड वर्षांपूर्वी निवड करण्यात आली होती. लाभार्थ्यांना तीन महिन्यांचे अनुदानही वाटप करण्यात आले होते. मात्र, मागील १३ महिन्यांचे अनुदान देण्यास तहसील कार्यालयाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. थकीत अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी ३० मे रोजी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी तहसीलदारांनी पंधरा दिवसांत अनुदान देण्याचे जाहीर केले होते. पण अद्यापही अनुदान देण्यात आलेले नाही. यामुळे शिवसेनेच्या वतीने सोमवार १८ जून रोजी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.