
सामना ऑनलाईन, जालना
शेतकऱ्यांनी रक्ताचे पाणी करून पीक विम्याचे हप्ते भरले आहेत. कंपन्यांनी काय गोलमाल केलाय माहिती नाही. गावागावांत मदत केंद्रे स्थापन करा. पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची माहिती घ्या. सगळे दस्तऐवज माझ्याकडे आणून द्या. विमा कंपन्यांची कार्यालये मुंबईतच आहेत. सौजन्याने पीक विमा दिला तर ठीक नाहीतर शिवसैनिक आहेतच! शेतकऱ्यांशी नडाल तर याद राखा, गाठ शिवसेनेशी आहे, असा खणखणीत इशारा आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे. तेव्हा त्याचा सातबारा संपूर्ण कोरा झालाच पाहिजे. शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
जालना जिल्हय़ातील साळेगाव घारे येथील चारा छावणीस आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. त्यानंतर दुष्काळग्रस्त बळिराजाशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक संपली. राजकारणी म्हणून कामही संपले. पण जबाबदारी संपली नाही आणि मी जबाबदारीतून मोकळा होणारा नाही. तुमचे आशीर्वाद हीच माझी मोठी जबाबदारी आहे. जनताजनार्दनाचे पाठबळ मिळवण्यासाठी अगोदर विश्वास कमवावा लागतो. आज शेतकरी संकटात आहे. जनावरांना घेऊन तो छावण्यांमध्ये राहतो आहे. त्याचे दुःख हे माझे दुःख आहे. आमचे नाते हे असेच आहे.
मराठवाडा दुष्काळमुक्त करा,शिवसेना तुमच्यासोबत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडय़ातील पुढच्या पिढीला दुष्काळ बघू देणार नाही असे म्हटले आहे. वाट कशाला बघता, घ्या निर्णय. शिवसेना कोणत्याही चांगल्या कामात मोडता घालत नाही. मराठवाडा दुष्काळमुक्त होणार असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. माझा प्रत्येक शिवसैनिक या कामी तुमची मदत करेल, असे आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले.
घर गहाण ठेवून छावणी सुरू केली
साळेगाव घारे येथील शिवसैनिक संदीप घारे याने सरकारी मदतीची वाट न बघता गावालगत चारा छावणी सुरू केली. सुरुवातीला चारा आणि पाणी उपलब्ध करण्यासाठी पैसे नव्हते. त्याने आपले घर गहाण ठेवून पैसा उभा केला. सध्या या छावणीत पाचशेपेक्षा जास्त जनावरे आहेत. संदीप घारे याच्या धाडसाचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर कौतुक करून त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली.
यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, खासदार प्रताप जाधव, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री संजय राठोड, आमदार संजय शिरसाट, संदिपान भुमरे, संजय रायमुलकर, जयदत्त क्षीरसागर, गोपीकिशन बाजोरिया, विप्लव बाजोरिया, सुनील प्रभू, शशिकांत खेडेकर, अजय चौधरी, संभाजीनगरचे महापौर नंदकुमार घोडेले, जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे, अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी आदींची उपस्थिती होती.
शिवसेनेने तुमचे सरकार झुकवले होते
सिंचनाचे 70 हजार कोटी रुपये पचवून हे आता आमच्यावर टीका करत आहेत. शिवसेनेला दुष्काळाची आठवण झाली असे शरद पवार म्हणाले. याच शिवसेनेने तुम्ही कृषिमंत्री असताना ‘देता की जाता’ अशी भीमगर्जना करून तुमच्या सरकारला सळो की पळो करून सोडले होते. शिवसेनेनेच तुमच्या सरकारला गुडघ्यावर आणले होते, झुकवले होते आणि कर्जमाफी करायला भाग पाडले होते, हे विसरलात का? मागच्या सरकारने नुसती स्वप्ने दाखवली. ही स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्याचे काम आम्ही करत आहोत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
खैरेंचा पराभव म्हणजे माझाच पराभव
मराठवाडय़ाच्या राजधानीत संभाजीनगर येथे शिवसेनेचा पराभव झाला. हा पराभव प्रत्येक शिवसैनिकाच्या जिव्हारी लागला असल्याचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले. हाच धागा पकडून उद्धव ठाकरे म्हणाले, चंद्रकांत खैरे यांचा पराभव हा माझा पराभव आहे. संभाजीनगर हा भगव्याचा गड. त्यामुळे येथे पुन्हा शिवरायांचा भगवा डौलाने फडकलाच पाहिजे.
त्याचे ओझे कशाला वाढवायचे
इथे आलो तेव्हा माझ्यासाठी खास सजवलेली बैलगाडी आणली होती. त्या बैलाच्या डोळय़ांत मला अपार कारुण्य दिसले. ‘माझे हाल संपवायला आलात का वाढवायला?’ असा प्रश्न दिसला. कशाला त्याचे ओझे वाढवायचे म्हणून मी बैलगाडीत बसलो नाही. पशुधन शेतकऱ्याचे वैभव, पण आज हे वैभव घेऊन बळीराजा छावणीत आश्रयाला आला आहे. पाऊस पडेल तेव्हा पडेल, पण छावण्या अजून काही दिवस चालवाव्या लागतील आणि त्यासाठी शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. किंबहुना साऱ्या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला मदत करणे हे आमचे कर्तव्यच आहे. हीच भावना घेऊन मी येथे आलो असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद योजना
जालण्याच्या चारा छावणीतील शेतकऱ्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद’ योजनेअंतर्गत अन्नधान्याची मदत देण्यात आली. तर सोलापुरात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या मदत योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघांत सुमारे 202 वाहनांद्वारे चारा छावण्यांतील पशुपालकांना एकवेळचे जेवण आणि चहा यासाठी लागणारा अन्नधान्याचा पुरवठा शिवसेनेकडून करण्यात येणार आहे. चारा छावण्या बंद होईपर्यंत ही मदत सुरूच राहणार आहे.
काय आहे कीटमध्ये?
या कीटमध्ये आटा, तांदूळ, डाळ, तेल, मीठ, तिखट, साखर, चहा पावडर आदी जिन्नस आहेत.





























































