
तीर्थक्षेत्र आणि सुसंस्कृत शहर अशी जगभर ओळख असलेले नाशिक गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज, जुगारी आणि गुन्हेगारांचा अड्डा झाले आहे. तरुण पिढी, कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. शेकडो तरुण आत्महत्येचा मार्ग पत्करून जीवन संपवत आहेत. शहराला नशेखोरी, जुगारी आणि गुन्हेगारीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी शिवसेना लढा उभारत आहे. या माफियांना पाठीशी घालणारे पोलीस प्रशासन, सत्ताधारी राजकीय नेते आणि सरकारला इशारा म्हणून 20 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिक येथे हॉटेल एक्प्रेस इनमध्ये शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. पोलीस प्रशासनच नव्हे, तर सध्याचे पालकमंत्री भुसे आणि ज्यांना नाशिकचे पालकमंत्री व्हायचे आहे ते मंत्री या ड्रग्जमाफियांना पाठीशी घालत असतील, तर शिवसेना स्वस्थ बसणार नाही. पाठीशी घालणाऱयांविरुद्ध तीव्र जनआंदोलन केले जाईल. नशेखोरीचे अड्डे उद्ध्वस्त केले जातील, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला. यावेळी जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, भारतीय कामगार सेनेचे जीवन कामत, उपनेते बबनराव घोलप, उपनेते सुनील बागुल, उपनेते अद्वय हिरे, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुधाकर बडगुजर, वसंत गीते, विनायक पांडे, विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, देवानंद बिरारी, महेश बडवे, संतोष गायकवाड, भागवत आरोटे, राहुल दराडे, वैभव ठाकरे आदी हजर होते.


























































