
शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही, शेतकऱ्यांना वीज मिळत नाही, पिकांचे प्रचंड नुकसान होऊनही 35, 50 रुपये देऊन पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांची थट्टाच चालवली आहे. याच्या निषेधार्थ आणि सरकारकडून शेतकऱ्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेने आज शेतकऱ्यांसह ‘रुमणे’ हातात घेऊन विद्युत भवनावर प्रचंड मोर्चा काढत शेतकऱ्यांना पूर्व विदर्भाप्रमाणेच दिवसा वीज द्यावी आणि पीक विमा कंपनीने ताबडतोब शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांची नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी केली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते माजी केंद्रीय मंत्री खासदार व पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख अरविंद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अकोला शहरात शेतकऱयांच्या नुकसान झालेल्या पिकांना पीक विमा कंपन्यांनी त्वरित नुकसानभरपाई द्यावी व पूर्व विदर्भात शेतीला पाणी देण्यासाठी 12 तास वीज देण्यात यावी या मागणीसाठी रुमणे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, सहसंपर्कप्रमुख सेवकराम तायडे, राजेज मिश्रा, महिला आघाडीच्या महिलांची शेतकरी बांधवांसह प्रचंड उपस्थिती होती.
यावेळी शेतकऱयांना मार्गदर्शन करताना अरविंद सावंत यांनी राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर कडाडून हल्लाबोल केला. ते म्हणाले, सुविधा आणि मूलभूत गरजांपासून हा शेतकरी वंचित राहिलेला आहे. संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांसाठी त्यांच्या न्याय्य हक्कांच्या लढय़ासाठी खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरणे हा शिवसेनेचा धर्म आहे आणि हे आम्हाला धर्म सांगतात, असा टोला भाजपला लगावला. यावेळी आमदार नितीन देशमुख यांनीही आपल्या भाषणात भाजपच्या शेतकरीविरोधी वृत्तीवर सडकून टीका केली.
आता न्याय मिळाल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही
आघाडी सरकार असताना एक टरबुज्या नेहमीच टीव्हीवर यायचा व वीज बिल माफ करा, वीज बिल माफ करा असे सांगायचा. अरे बाळा, आता तुझं सरकार आहे ना! कर नं वीज बिल माफी. आता कसला विचार करतोय, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला. शेतकरी व शिवसैनिक या मोर्चात शांततेने हातात रुमणे घेऊन आलेत. पुढे हे रुमणे कुठे जाईल याचा विचार प्रशासनाने करावा, असा इशारा देत त्यांनी आता शेतकऱयांना न्याय मिळाल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असे सरकारला ठणकावले.
























































