राज्यातील सध्याचं मुख्यमंत्रीपद म्हणजे उताराला लागलेली गाडी, संजय राऊतांचे टीकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी मुख्यमंत्री मानायलाच तयार नाही. टॉप 10 च्या यादीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव नाही हे राज्यच दुर्दैव आहे. महाराष्ट्र राज्य हे औद्योगिक आणि आर्थिक दृष्ट्या एक प्रगतशील राज्य म्हणून गणलं गेलं आहे. मात्र गेल्या सहा ते सात महिन्यांपासून देशात महाराष्ट्राचे महत्व कमी झाले आहे. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना टॉप 10 च्या यादीत ते पहिल्या पाच आणि चार मध्ये असायचे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्या क्रमांकावर जाण्याची गती पकडत असताना हे सरकार पाडण्यात आलं. महाराष्ट्राची प्रगती आणि विकास काही लोकांना पाहवत नव्हता, म्हणून महाराष्ट्राचे पंख कापण्यासाठी हे सरकार पाडून दिल्लीची हस्तक असणारी व्यक्ती या मुख्यमंत्री पदावर बसवली. म्हणूनच या महाराष्ट्राची अधोगती सुरु आहे. राज्याचं सध्याचं मुख्यमंत्रीपद म्हणजे उताराला लागलेली गाडी आहे. अशी टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. सोमवारी सकाळी ते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत होते.

यावेळी ते म्हणाले की, शिखरावर निघालेला महाराष्ट्र आज पुन्हा कोसळताना दिसत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्या 10 मध्ये देखील नाहीत याचं मिंधे गट आणि राज्यातील भाजपमधील प्रमुख लोकांना वाईट वाटलं पाहिजे. मात्र त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील तर हे दुर्दैवी आहे. सेनापती बापट यांचा एक मंत्र होता, ”महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले.” त्यामुळे महाराष्ट्राविना राष्ट्र चालविणे हे सोपं आहे हे दिल्लीचं तख्त दाखवून देत आहे.

राहुल गांधी यांना बजावण्यात आलेल्या हक्कभंगाच्या नोटीस बद्दल त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशा साधला. ते म्हणाले की, राहुल गांधी यांना नोटीस बजावण्याचं काही कारण नाही. लोकसभेत त्यांनी एक उद्योगपती आणि मोदी यांच्या असलेल्या संबंधांसंदर्भात जे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचं उत्तर पंतप्रधानांनी द्यायला हवं ती संधी त्यांना प्राप्त झाली होती. खरंतर जनतेच्या भावनांचा हक्कभंग हा पंतप्रधानांनी केला आहे. प्रश्नाचे उत्तर न देणे हा पळपुटेपणा आहे. त्यानंतर तुम्ही लोकसभा नियमांचा आणि संसदेच्या नियमांचा आधार घेऊन संसद सदस्यांना नोटीस पाठवतंय यालाच हुकूमशाही म्हणतात.

भाजपवाले मुंबई महानगर पालिकेसाठी 150 काय तर 450 चा आकडा देखील देऊ शकतात. मात्र राज्यात जिथल्या महानगर पालिकांवर शिवसेनेची सत्ता होती तिथे पुनः एकदा शिवसेनेचा भगवा फडकणार याविषयी आमच्या मनात अजिबात शंका नाही. जो मुख्यमंत्री पहिल्या 10 मध्ये येऊ शकत नाही त्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात भाजप कोणतीही निवडणूक जिंकूच शकणार नाही. असे मत राऊत यांनी व्यक्त केले.

निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांचे निकाल हे सरकारच्या आणि फुटलेल्या मिंधे गटाच्या बाजूनेच येतील तुम्ही आनंद उत्सव साजरा करण्याच्या तयारीला लागा अशा प्रकारची भाषा देवेंद्र फडणवीस, नारायण राणे आणि मिंधे गटाचे काही मंत्री आणि आमदार करत आहेत. याचा अर्थ निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाला यांनी विकत घेतलय का? हा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

पुढे ते म्हणाले की, सध्या ‘सोनेरी टोळी’च काम महाराष्ट्रात सुरु आहे. ही टोळी मंत्रालयात आणि मंत्र्यांच्या बंगल्यांवर असते आणि हळू हळू हे विषय मी समोर आणेन. राज्यातील या ‘गोल्डन गॅंग’चा शोध घ्या, असं माझं पत्रकारांना आव्हान आहे.