
सामना ऑनलाईन, पणजी
महाराष्ट्रात भाजप सोबत युती असली तरी गोव्यात शिवसेना लोकसभेच्या दोन्ही निवडणुका लढवणार आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. लोकसभेव्यतिरिक्त शिवसेना मांद्रे विधानसभेची पोटनिवणूकही लढवणार आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने सुभाष वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंच सोबत युती केली होती. यावेळी गोवा सुरक्षा मंचने विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये तीनही मतदारसंघात त्यांचे उमेदवार दिले आहेत. असे असले तरी शिवसेनेचे दरवाजे चर्चेसाठी खुले असून आज किंवा उद्या वेलिंगकर यांच्याशी चर्चा करून सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शिवसेनेने शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर गोव्यातून शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत यांना उमेदवारी दिली आहे तर दक्षिण गोव्यातून राज्य उपाध्यक्ष राखी प्रभूदेसाई-नाईक यांना उमेदवारी देण्याचं ठरवलं आहे.
























































