राज्य गुंडांच्या ताब्यात, याला सर्वस्वी फडणवीसच जबाबदार; संजय राऊत यांचा हल्लाबोल

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुंडांच्या टोळ्या आणि त्यांचे म्होरके यांचे कसे घनिष्ठ संबंध आहेत आणि ते वाढत आहेत, याबाबतचे फोटो आपण प्रसिद्ध केले. मुख्यमंत्र्यांचे पुत्र त्यांच्या राजकीय फायद्यासाठी ठाणे, कल्याणमधील गुंडांना सोबत घेत दहशत पसरवत आहेत, हेदेखील आपण उघड केले होते. त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना त्या गुंड टोळ्या सोबत होत्या. त्यांचे आपापसात गँहवॉर झाले, ही बातमी आमच्यासाठी आश्चर्यकारक नाही. ठाणे, कल्याणमधील अनेक गुंड टोळ्या मिळून त्यांचा पक्ष निर्माण झाला आहे. तो शिवसैनिकांचा पक्ष नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

गुंडाना तुरुंगातून सोडायचे, गुन्हेगारी आरोप असलेल्या पोलिसांची मदत घ्यायची आणि त्यांचा राजकारणासाठी वापर करायची, अशी सध्या राज्यातील गंभीर परिस्थिती आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस डोळ्यांवर पट्टी बांधून बसले आहेत किंवा उघड्या डोळ्यांनी ते हे सर्व सहन करत आहेत. ज्यांच्यावर गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप आहेत, त्यांना तुरुंगात पाठवायला हवे, असे फडणवीस आणि त्यांचे पक्षांचे म्हणणे होते, अशा लोकांना फडणवीस-शिंदे सेनेने उमेदवारी दिली आहे आणि त्यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फडणवीस जात आहेत. हा काळाने त्यांच्यावर घेतलेला सूड आहे, असेही राऊत म्हणाले.

फडणवीस आता दक्षिण मुंबईत यामिनी जाधव यांचा अर्ज भरण्यावेळी जाणार आहेत. तिथे जाण्यापूर्वी विधानसभेत त्यांनी स्वतः जाधव दाम्पत्याबाबत केलेले भाषण ऐकावे आणि स्वतःला आरशात बघावे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. सध्या राज्य गुंडांच्या ताब्यात आहे. हे सर्व संगनमताने सुरू असून याला सर्वस्वी देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. अशा प्रकरणात पोलीसही हतबल आहेत. त्यांना गुंड टोळ्यांमध्ये सहभागी करून घेत पोलीस माफिया हा नवा प्रकार निर्माण केला आहे. या पोलीसांना विरोधकांवर हल्ला करण्यासाठी सोडले आहे. पोलीस आणि पोलीस प्रशासन यामुळे हतबल झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

अमेठीची जागा ही काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. गांधी-नेहरू परिवार आणि त्यांचे निकटवर्तीय या जागेवर निवडणूक लढले आणि जिंकले आहेत. त्यामुळे कोण कोणत्या जागेवर लढत आहे, याचा विचार करण्यापेक्षा भआजपने निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करावे. स्मृती इराणी यांची आपल्याला दया येत आहे. आता त्या राहुल गांधी यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याकडून पराभूत होणार आहेत. काँग्रेसने खूप विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. के. एल. शर्मा हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. एका निष्ठावातं कार्यकर्त्याला काँग्रेसने तिकीट दिले, तर भाजपला का त्रास होत आहे. हा काँग्रेसचाच कार्यकर्ता आहे. भाजपप्रमाणे निवडणूक लढण्यासाठी उमेदवार आयात करण्याची वेळ काँग्रेसवर आलेली नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

मतांची टक्केवारी वाढली पाहिजे, लोकशाहीत मतदान महत्त्वाचे आहे, मात्र लोकांमध्ये मतदानाबाबत निराशा आणि निरुत्साह का आहे, याचा विचार करणेही गरजेचे आहे. कमीतकमी 80 टक्के जनतेने मतदान करायला हवे. मतदानाच्या दिवशी सुटी घेत पर्यटनाला जाणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. देशातील लोकशाही वाचवायची असेल, तर जास्तीतजास्त लोकांनी मतदान करण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

नकली सेना आणि नकली पक्ष असलेल्यांनाही स्वतःची भूमिका मांडावी लागते. ते नकली का आहेत. त्यांना असे का करावे लागले, हे स्पष्ट करण्याची गरज आहे. मोदी आमच्याकडे खिडकीतून बघत आहे. त्यामुळे निवडणुकांचे निकाल काय असतील, याची कल्पना येत आहेत. आता त्यांनी कितीही खुणावेले तरीही इंडिया आघाडीतील कोणताही घटक पक्ष जाणार नाही. आम्ही निवडणूक जिंकणार असून इंडिया आघाडीच सत्तेवर येणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आता मोदी यांना पराभव समोर दिसत आहे. त्यांच्या पायखालची वाळू सरकत आहेत. त्यामुळे ते अशी विधाने करत आहेत. बाळासाहेबांची शिवसेना फोडून ती गद्दारांच्या हाती देणारे शिवसेनेची किंवा आमची मदत काय करणार, ते खोटे बोलत आहे. आता त्यांच्या भूलथापांना कोणाही बळी पडणार नाही. मोदी यांचा पराभव निश्चित असून इंडिया आघाडीच सत्तेवर येणार, असेही संजय राऊत यांनी ठणकावले.