शिवसेनेला बदनाम करणाऱ्यांचा बुरखा फाटला, संजय राऊत यांनी ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याचे फोटोच दाखवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या राज्यव्यापी शिबीराच्या नियोजनाच्या निमित्ताने पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. शिवसेनेचे नाशिकमधील पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांचे मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबतचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपकडून आरोप होत होते. तसेच या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात येत आहे. मात्र आता या प्रकरणामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्याचेही नाव समोर आल्याचे पत्रकारांनी विचारताच संजय राऊत यांनी थेट भाजप पदाधिकाऱ्याचे फोटोच दाखवून भाजपला अडचणीत आणले आहे. हे फोटो दाखवून संजय राऊत म्हणाले की, तुम्ही फोटो पाहा मी कुठलेही आरोप करत नाहीय मात्र या फोटोंमधून शिवसेनेवर आरोप करणाऱ्यांचा आणि सुधाकर बडगुजर आणि शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा बुरखा फाटला आहे.

संजय राऊत म्हणाले, मकाऊचा चंद्रशेखर बावनकुळे यांचा व्हिडीओ बडगुजर यांच्या कुटुंबाने दिला म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली,हे कारवाईचे कारण होऊ शकतं? की कुठलातरी व्हिडीओ कोणीतरी दिला आणि म्हणून बडगुजर यांच्यावर कारवाई. म्हणजे कायदा आपला अशापद्धतीने काम करतो? मुळात तो व्हिडीओ बडगुजर यांच्याकडून आलेला नाही. बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो. मी एकतर शपथ घेत नाही. त्यात बाळासाहेब माझे दैवत आहेत.त्या व्हिडीओचा सुधाकर भाऊ यांचा काही संबंध नाही.ते भाजपवाल्यांनी आपापसात विचारायला हवं की कोणी दिला, त्यांना माहित आहे हा व्हिडीओ आमच्यापर्यंत कसा आला ते. भाजप परिवाराला आणि संघ परिवाराला कसा आला ते माहित आहे. विशेषता नागपूरच्या लोकांना माहित आहे तो कोणी दिला तो. काय तुम्ही करता? जी काय सो कॉल्ड पार्टी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याने आयोजित केली होती. व्यंकटेश याच्या पार्टीला यांना आमंत्रण दिले होते आणि ती पार्टी झाली. मुळात त्या संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला, कोणी सोडलं. गृहमंत्री कोण होतं ? कोणी सोडलं त्याची चौकशी करा.जर तो बॉम्बस्फोटातला भयंकर अपराधी होता मग त्याला तुरुंगातून बाहेर सोडण्याची परवानगी कोणत्या गृहमंत्र्यांच्या सहीने झाली. शिवसेनेकडे कधी गृहखातं नव्हतं आणि 2016 आमच्याकडे सत्ता नव्हती फार. गृहखांत कोणाकडे होतं, गृहमंत्र्याच्या सहीशिवाय बॉम्बस्फोटातील आरोपीला अशाप्रकारे कोणी पॅरोलवर सोडतं का ? त्याचा तपास भाजपने करावा आणि नंतर त्यांनी आमच्याकडे बोट दाखवावं. फडणवीसांचे फोटो या गुन्हेगारासोबत व्हायरल झाले आहेत. आजही तो भाजपचा नाशिकचा पदाधिकारी आहे. आता भाजपच्या पदाधिकाऱ्याने नाशिकमधल्या आपल्या राजकीय इतर पक्षाच्या सर्व पक्षांच्या सहकाऱ्यांसाठी जेवण आयोजित केले असेल. आपली परंपरा आहे तिथे जाणे, बसणे, चर्चा करणे ठिक आहे. त्यामुळे भाजपमधली सलीम कुत्ताचे जे सहकारी जे काय प्रश्न विचारत आहेत त्यांनी एक बोट स्वत:कडे आहे ते पाहावे.

नाशिकमध्ये 23 जानेवारीला होणारे शिवसेनेचे महाशिबीर आणि खुलं अधिवेशन याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, या महाशिबीरातचे यजमानपद नाशिककडे असल्यामुळे इथले सर्व प्रमुख माझ्याबरोबर आहेत. हुतात्मा कान्हेरे मैदानावर हे महाशिबीर होणार असून त्याच्या तयारीसाठी आम्ही सर्व इथे आलेले आहोत आणि यापुढे पुढला महिनाभर सतत येत राहू.महाराष्ट्रातल्या विधानसभा, लोकसभेच्या दृष्टीने जे रणशिंग फुंकायचे आहे. ते या श्रीरामाच्या भूमीतून फुंकले जावं अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भावना आणि श्रद्धा आहे. त्याच्यामुळे या पंचवटीतून या लढाईला सुरुवात होईल. राम-रावण युद्ध, सत्याचे युद्ध हे या भूमीतून व्हावे कारण त्यावेळेला ‘दार उघड बये दार उघड’ ही इथूनच गर्जना घुमली होती आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसाठी दरवाजे गावागावात उघडले गेले होते. त्यासंदर्भात सविस्तर नक्कीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्याशी बोलतील.

विद्याप्रतिष्ठान कॉलेजसाठी 25 कोटींची देणगी दिल्यामुळे शरद पवार यांनी गौतम अदानी यांचे कौतुक केले यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, त्यात चुकीचे काय आहे? अशा अनेक शैक्षणिक संस्थांना उद्योगपती देणग्या देत असतात.गौतम अदानी यांच्यासंदर्भात काही मतं आहेत. धारावीसंदर्भात आम्ही त्यांच्याविरोधात मोर्चा काढला. गौतम अदानींनी प्रधानमंत्री केअर फंडाला देणगी दिलेली आहे. इतर काही संस्थांना देणगी दिलेली आहे.मग सगळ्यांना प्रश्न विचारा तुम्ही.

अडीच वर्षामध्ये घाण केली ती आम्ही साफ करणार आम्ही अशी सत्याधारांकडून बोलले जाते याबाबत बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. 2024 ला कोणती घाण साफ होतेय आणि कोण कचऱ्याच्या डब्यात जातेय, हे कळेल. आदित्य ठाकरे हे त्या भागाचे कार्यक्षम आमदार आणि लोकप्रतिनिधी आहेत. वरळीची जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरेंना घाबरतात.हे आपण सर्वांनी पाहिलेले आहे.

मनोज जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ नये

मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, मनोज जरांगे पाटील त्यांच्यावर उपोषणाची वेळ येऊ नये अशी माझी भूमिका आहे, सातत्याने अशाप्रकारची उपोषणं केल्यामुळे प्रकृतीवर परिणाम होतो. त्यांची प्रकृती नाजूक आहे. सरकारने त्यांच्यावर उपोषणाची वेळ आणू नये. मुंबईत महाराष्ट्राच्या राजधानीत त्यांनी जर उपोषण केले तर संपूर्ण महाराष्ट्रावर त्याचा ताण पडतो. त्यामुळे जरांगे पाटील यांना सगळ्यांनी उपोषणापासून रोखायला हवे. ही सरकारतची जबाबदारी आहे. मी या गोष्टीला राजकीय फायद्याच्या दृष्टीने बघत नाही,समाज संघर्ष करतोय त्याचे नेतृत्व जरांगे पाटील करत आहेत.

राम मंदिरासाठी आम्ही लाठ्या-काठ्या खाल्ल्या

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी नाशिकमध्ये आमचे महाशिबीर आहे. चांगल्या कार्यासाठी मुहूर्त तर आम्ही पकडतोच ना. 22 तारखेला मोदींच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन अयोद्धेत आहे, आमच्यालाठी पंचवटी हीच अयोध्या आहे. अयोद्धेमध्ये मोदींपेक्षा आम्हीच जास्त गेलो आहोत. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गेले आहेत.आम्ही आंदोलनात गेलो आहोत, आम्ही लाठ्या, काठ्या खाल्ल्या आहेत. संपूर्ण खटल्याचा आरोपी आहोत, मी स्वत: त्यातला आरोपी आहे. त्यानंतर मधल्या काळात मुख्यमंत्री असताना आणि नसताना उद्धव ठाकरे तिथे गेलेले आहेत. आम्हाला अयोध्या नवीन नाही म्हणूनच आम्ही महाशिबीराची जागा पंचवटी निवडली असल्याचे संजय राऊत म्हणाले.

भाजपवाल्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्याऐवजी आधी अंतर्वस्त्रे साफ करावीत

भाजप वाल्यांनी आधी स्वत:ची अंतर्वस्त्रे साफ करावीत, कपडे साफ करावेत त्यांनी आमच्या लेन्सवर बोलू नयेत .माननीय शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अयोद्धेचे आंदोलन मोठ्या स्तरावर झाले. तुम्ही आधी आडवाणी साहेबांना आमंत्रण दया. ज्यांनी रथयात्रा काढली, ज्यांनी रामाचे आंदोलन पुढे नेले आणि ज्यांच्यामुळे हे सर्व प्रधानमंत्री, गृहमंत्री, मंत्री आहेत त्या लालकृष्ण आडवाणींना आमंत्रण नाही आधी त्याच्यावर बोला.