
सामना प्रतिनिधी, धुळे
अमळथे वाळू घाट प्रक्रियेस फक्त अमळथेसह वरपाडे, नेवाडे, सोनेवाडी, अक्कडसे, वरसुस येथील ग्रामस्थांचाही तीव्र विरोध आहे. या वर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती व वाळू उपशामुळे पाण्याची खालावलेली पातळी, तसेच 12 कोटी खर्च झालेल्या रस्त्याचे होणारे नुकसान यामुळे अमळथे वाळू घाट प्रक्रिया त्वरित थांबवावी, कुठल्याही परिस्थितीत वाळू घाट देण्यात येऊ नये नाही तर संघर्ष उभा करून जनआंदोलन उभारावे लागेल, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी दिली.
जिह्यातील तापी नदीवरील शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील अमळथे, टाकरखेडा व लोंढरे या गावांची वाळू घाट लिलाव प्रकियेची निविदा जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली आहे. तापी नदीवरील अमळथे या गावाची वाळू घाट प्रक्रिया सुरुवातीपासूनच वादात सापडलेली आहे. अमळथे गावाचे लोकनियुक्त सरपंच यांनी कुठल्याही प्रकारची ग्रामसभा न घेता ग्रामसेवकावर दडपण आणून खोटा ग्रामसभेचा ठराव केला व अमळथे वाळू घाट लिलाव प्रक्रियेला चालना दिली. परंतु अमळथे येथील उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना ही बाब कळल्यानंतर सरपंच व ग्रामसेवक यांना जाब विचारला असता त्यांनी खोटा ठराव दिल्याचे कबुल केले. त्यानंतर गावकरी व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या प्रक्रियेस विरोध दर्शविला. गटविकास अधिकारी यांनी विशेष ग्रामसभा बोलावून मागील ठराव रद्द केला व नव्याने वाळू ठेका देण्यात येऊ नये असा ठराव पारीत करण्यात आला. त्यानंतर अमळथे ग्रामस्थांनी व शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आणि अमळथे वाळू ठेका देण्यात येऊ नये असा ठराव दिला. त्या वेळी जिल्हाधिकाऱयांनी आश्वासन दिले होते की, कुठल्याही परिस्थितीत वाळू घाट लिलाव प्रक्रिया होणार नाही.
परंतु शासनाने वाळू घाट लिलाव प्रक्रिया निविदा वर्तमानपत्रातून वाचल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसला. शासनाचे धोरण आहे की, ग्रामसमभेचा ठराव असल्याशिवाय वाळू घाट लिलाव प्रक्रिया राबविता येत नाही. अमळथे वाळू घाट दिल्यास नुकताच शिंदखेडा ते वरपाडे या रस्त्याचे 12 कोटी खर्च करून काम पूर्ण करण्यात आले. रस्ता व्हावा म्हणून पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे हेमंत साळुंके यांनी अनेकदा पाठपुरावा व पत्रव्यवहार केलेला होता त्याची फलनिष्पत्ती होऊन रस्ता पूर्ण झाला. परंतु अमळथे वाळू घाट दिल्यास 12 कोटी रुपयांच्या रस्त्याची दुरवस्था तीन महिन्यांत होणार आहे.




























































