विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकलाच पाहिजे – रामदास कदम

70

सामना प्रतिनिधी । जालना

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ज्याला उमेदवारी मिळेल, त्याला शिवसैनिकांनी विधानसभेत पाठवावे. विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकलाच पाहिजे, असे आवाहन शिवसेना नेते तथा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले. ते जालना येथील आयोजित बेजो शीतल कंपनीत शिवसेना लोकप्रतिनिधी व पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, उपनेते लक्ष्मण वडले, प्रा. नितीन बानगुडे-पाटील, आमदार जयप्रकाश मुंदडा, धाराशिवचे संपर्कप्रमुख तान्हाजी सावंत, सहसंपर्कप्रमुख शिवाजी चोथे, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, युवासेनेचे जगन्नाथ काकडे आदींची उपस्थिती होती.

शिवसेना नेते तथा पर्यावरणमंत्री रामदास कदम म्हणाले की, शिवसेना ज्या उमेदवाराला उमेदवारी देईल, त्याला विधानसभेत पाठविण्याची जबाबदारी शिवसैनिकांची असून, येत्या निवडणुकीत विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकलाच पाहिजे. शिवसेना रस्त्यावर येऊन लढणारा पक्ष असून, मराठी माणसांसाठी सातत्याने लढा दिला. शिवसेनेने अनेकांना मोठे केले असून, कांदीवलीत राहणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला मंत्री केले. शिवसेनेच्या १९९५-९९ च्या सत्ताकाळात शिवसेनेने प्रचंड विकासकामे केली. मात्र, या विकास कामांना प्रसिद्धी मिळाली नाही.

भाजपचा समाचार घेताना शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले की, महाराष्ट्रात भाजप नव्हती. भाजपने पोटात घुसून चांगले मतदारसंघ घेतले. त्यानंतर शिवसेनेचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला. गेल्या १० वर्षांत भाजपने हे सातत्याने केले. मात्र, शिवसेना संपणार नाही. विधानसभेच्या वेळी नरेंद्र मोदी मुंबईत आले होते. आता शिवसेनाप्रमुख नाहीत. त्यामुळे शिवसेनेला जागा मिळणार नाही, असे म्हणाले. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ६३ जागा निवडून आणल्या.

प्लास्टिक बंदीसंदर्भात ते म्हणाले की, प्लास्टिक बंदीच सर्वच स्तरातून जोरदार स्वागत झाले असून, शिवसेना नेते अदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसारच प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. यापुढे गुटख्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक पाऊचवर बंदी घालण्यात येणार आहे. राज्यातील नगरपालिका व महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात कचऱ्यापासून खते निर्मिती करण्याचाही प्रयत्न करण्यात येणार आहे.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाने पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना भारावून सोडले. ते म्हणाले की, शिवसैनिकांनो, तुम्ही कोणतेही काम करताना निवडणुकीचे असो, संघटना बांधणीचे असो, सामाजिक असो वा कौटुंबिक ते अत्यंत नियोजनपूर्वक करा. तुम्हाला त्यामुळे कधीही अपयश येणार नाही. होऊन गेलेला भुतकाळ पुन्हा-पुन्हा उगाळत बसू नका, भविष्याकडे पाहा. नव्याने सुरुवात करा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना ही मुळातच संघर्षातूनच निर्माण झालेली आहे. त्यामुळे संघर्षाला कधीही टाळू नका. आपण सैनिक आहोत, याचे भान सदैव ठेवा.

उपनेते लक्ष्मण वडले म्हणाले की, वाढत्या महागाईच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीतून दिलासा देण्याऐवजी शासनाने तऱ्हेतऱ्हेचे शासन निर्णय काढून कर्जमाफी मिळणे तर दूरच उलट शेतकऱ्यांची अवहेलना केल्याचा आरोप त्यांनी केला. दिलेल्या शब्दाला न जागणारे हे भाजपचे शासन लोकांच्या मनातून उतरले आहे. येत्या काळात शिवसेना हा एकमेव पक्ष या सर्व गोष्टींवर पर्याय असून, लोक आशेने तुमच्याकडे पाहत असल्याचे ते म्हणाले. आता कोणत्याही परिस्थितीत मागे न सरता प्रत्येक ठिकाणी आपला शिवसैनिक कसा निवडून येईल, यासाठी आटोकाट प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले.

संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर म्हणाले की, मराठवाडा सातत्याने शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. या भागात मी गेली अनेक वर्षे काम करीत असून, येथील खेड्यापाड्यांत फिरलो आहे. येथील लोकांच्या मनात शिवसेनेविषयी प्रचंड प्रेम असून, ते त्यांनी मतपेटीतून दाखवून दिले आहे. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा-विधानसभा या निवडणुकांतही लोकांच्या भावना लक्षात घेऊन शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी कठोर परिश्रम घेऊन त्यांना अडीअडचणीत मदत करावी, असेही ते म्हणाले. शिवसेनाप्रमुखांचे विचार गावागावांपर्यंत घेऊन जा. आपापसातील सर्व मतभेद विसरून एकजुटीने काम करा, मग भविष्य काळ तुमचाच, असेही ते म्हणाले.

शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख शिवाजी चोथे म्हणाले की, शिवसेना स्थापनेपासून तर आजपर्यंत झालेल्या वाटचालीचा मी साक्षीदार आहे. राज्यासह जिल्ह्यात झालेल्या घडामोडी मी अनुभवल्या आहेत. अगदी तांड्या-वस्तीपर्यंत पक्ष पोहचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले असून, त्याची फळे आज आपणास चाखावयास मिळत आहे. परंतु सत्तेच्या या काळात शिवसैनिक महत्त्वाचे असून, त्यांच्या विकासासाठी लक्ष देणे गरजेचे आहे. एकमेकांत असलेले हेवेदावे पक्षाला मागे घेऊन जाण्यास भाग पाडतात. त्यामुळे पदाधिकारी व शिवसैनिकांनी आपापसात समन्वय ठेवून काम करावे व पक्ष मजबूत करावा, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे म्हणाले की, जालना जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने आम्ही वेगवेगळी आंदोलने, मोर्चे, निवेदने, घेराव घालून जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो. शिवसेनेच्या माध्यमातून कायम जनतेला आधार देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर व ए. जे. बोराडे यांनी केले.

मुंबईवरून खास प्रशिक्षणासाठी आलेले मारुती साळुंखे यांनी आपल्या उत्तम शैलीत तडाखेबाज भाषण कसे करावे, सूत्रसंचालन कसे करावे, याकरिता कोणती तयारी करावी, काय बोलावे, किती बोलावे, कुठे बोलावे या सर्व बाबींचा उहापोह प्रशिक्षणातून केला. उत्कृष्ट भाषणाचा नमुना, सूत्रसंचालनाचा नमुना त्यांनी श्रोत्यांसमोर कथन केला. वक्त्यांनी भाषणात कवितेच्या ओळी, म्हणी, वाक्प्रचार, शिव वचने, अभंग, ओव्या यांची उदाहरणे द्यावीत. ज्यामुळे भाषण प्रभावीरीत्या होऊन श्रोत्यांच्या गळी उतरविता येत असल्याचे सांगत वक्त्यांसाठी शिवसेनेच्या वतीने लवकरच पुन्हा वेगळे शिबीर चालविण्यात येणार असून, आगामी काळात वेळोवेळी पक्षांमार्फत आपली नावे पाठवावीत, असेही आवाहन त्यांनी केले.

यावेळी किसान सेनेचे भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख पंडितराव भुतेकर, माधवराव कदम, हरिहर शिंदे, हनुमान धांडे, भगवान कदम, रमेश गव्हाड, मनीष श्रीवास्तव, परमेश्वर जगताप, तालुकाप्रमुख संतोष मोहिते, हरिभाऊ पोहेकर, जयप्रकाश चव्हाण, शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे, महिला आघाडीच्या सविता किवंडे, युवा सेनेचे भाऊसाहेब घुगे, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, बाला परदेशी, पंचायत समिती सभापती पांडुरंग डोंगरे, भरत मदन, तालुकाप्रमुख अशोक बर्डे, उद्धव मरकड, बाबासाहेब तेलगड, अजय अवचार, महिला आघाडीच्या गंगूबाई वानखेडे, राधा वाढेकर, दुर्गा देशमुख, मंजूषा घायाळ यांच्यासह जिल्हाभरातील जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, नगरसेवक, उपतालुकाप्रमुख आदींची उपस्थिती होती.

पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना `जीवरक्षक लोकनेता’ पुरस्कार
पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पुढाकार घेऊन राज्यात प्लॅस्टिकबंदी केली. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून राज्य बचावले असून, यामुळे अनेकांचे जीव वाचणार आहेत. त्यामुळे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना जिल्हा शिवसेनेच्या वतीने ‘जीवरक्षक लोकनेता’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी आमदार राहुल पाटील, आमदार जयप्रकाश मुदंडा, हिंगोलीचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, सहसंपर्कप्रमुख आनंद जाधव, नांदेडचे जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, सहसंपर्कप्रमुख प्रकाश कौडगे, मनोज भंडारी, परभणी जिल्हाप्रमुख संजय कच्छवे, विशाल कदम, धाराशिवचे जिल्हाप्रमुख गौतम लटके, अनिल खोचरे यांच्यासह जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव आदी जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी प्रास्ताविक केले.

आपली प्रतिक्रिया द्या