गुणरत्न सदावर्तेयांना मोठा धक्का; एसटी बँकेचे संचालक सौरभ पाटील यांची अखेर हकालपट्टी

एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांची सहकार आयुक्तांनी पदावरून हकालपट्टी केली आहे. पाटील यांनी पदासाठीचा एकही निकष पूर्ण केला नाही, असे सांगत ही कारवाई केली आहे. पाटील हे गुणरत्न सदावर्ते यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे या कारवाईने सदावर्ते यांना जोरदार धक्का बसला आहे. संचालकपदावर नेमणूक करताना आरबीआयकडून परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे पाटील यांची थेट हकालपट्टी केली आहे.

एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी वर्णी लावलेल्या सौरभ पाटील यांनी एकही निकष पूर्ण केला नाही. पाटील यांचे वय अवघे 25 आहे. त्यांच्याकडे सहकार क्षेत्राचा पुरेसा अनुभव नाही. शिवाय त्यांना आरबीआयची परवानगीही मिळाली नव्हती. त्यामुळे ते कोणत्याच निकषात बसत नव्हते. परिणामी त्यांना पदावरून दूर करण्याशिवाय सहकार आयुक्तांकडे कोणताच पर्याय नव्हता. त्यामुळे आयुक्तांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. या काळात बँकेच्या ठेवीही मोठय़ा प्रमाणावर काढण्यात आल्या आहेत. या निर्णयाविरुद्ध एसटी बँक संचालक मंडळानेसुद्धा नाराजी व्यक्त केली होती. हे प्रकरण वादग्रस्त ठरल्याने या प्रकरणाची चौकशीही सुरू होती. पाटील यांना पदमुक्त केल्याने आता त्वरित नव्या संचालकांनी नेमणूक करावी, असे सहकार आयुक्तांनी म्हटले आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनेलची एसटी बँकेवर सत्ता आहे.

काय आहेत निकष

  • संचालकपदासाठी किमान 8 वर्षांचा अनुभव आवश्यक
  • संचालकपदासाठी व्यक्तीचे वय 35 वर्षे पूर्ण असावे
  • नेमणुकीसाठी आरबीआयची परवानगी आवश्यक