
भाजपच्या एका पदाधिकाऱ्याचा अश्लील कारभार चव्हाट्यावर आला आहे. एका महिलेला रात्रीअपरात्री व्हॉट्सअपवर व्हिडीओ कॉल करून त्या पदाधिकाऱ्याने नको ते कृत्य केल्याचे समोर आले आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून युसूफ रंगवाला या पदाधिकाऱ्याविरोधात डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिला या दक्षिण मुंबईत राहतात आणि समाजसेविका म्हणून कार्य करतात. त्यांनी युसूफ रंगवाला या भाजप पदाधिकाऱ्याविरोधात गंभीर आरोप केला आहे. युसूफ याने अलीकडे एका रात्री दोन वाजता व्हॉट्सअपवर संदेश पाठवून एका तासासाठी तुझ्या घरी येऊ का अशी विचारणा केली. त्यावर नकार दिल्यानंतर युसूफने व्हॉट्सअपवर व्हिडीओ कॉल केला. तो कॉल उचलला असता युसूफ हा नग्न अवस्थेत होता, असे तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे. इतकेच करून युसूफ थांबला नाही, तर त्याने अश्लील चाळे करून दाखवले. या तक्रारीवरून डोंगरी पोलिसांनी युसूफ रंगवाला याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. युसूफने इंस्टा आयडीवर भाजपचा वॉर्ड अध्यक्ष २२४ असे लिहीत आपला फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे तो भाजपाचा पदाधिकारी असल्याचे समजते. या प्रकरणी डोंगरी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. शिवाय या वॉर्डात युसूफ भाजपाकरिता काम करतो असे तक्रारदार महिलेने दिलेल्या जबाबात नमूद केले आहे.























































