
श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याच्यावर कायद्याचा फास आवळला जात आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेले दिल्ली पोलीस आरोपी आफताबविरुद्ध पुरावे गोळा करण्यात गुंतले आहेत. या प्रकरणात श्रद्धाच्या शरीराचे अवयव शोधण्याचे सर्वात मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आरोपी आफताबला जंगलात नेले. गेल्या सहा महिन्यांत दिल्लीतील विविध भागात सापडलेल्या अज्ञात मृतदेहांचाही पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान दिल्लीच्या गुडगाव येथील जंगलात पोलिसांना एक बॅग सापडली असून त्यात मोठ्या प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत असणारे मानवी शीर आढळून आले आहे. ते शीर पोलिसांनी फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवले आहे. दरम्यान आफताबने पोलिसांना सांगितले की मी श्राद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले नसून 18 तुकडे केले आहेत.
पाच दिवस आफताबची चौकशी करूनही दिल्ली पोलिसांना श्रद्धाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरलेले शस्त्र आणि मृतदेहाचे तुकडे अद्याप पूर्णपणे सापडलेले नाहीत. श्रद्धा पालकर हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आफताबला गांजाचे व्यसन आहे. यावरून त्याचे श्रद्धासोबत भांडण होत असे. आफताबने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले आहे की, ज्या दिवशी त्याने श्रद्धाची हत्या केली, त्या दिवशीही तो गांजाच्या नशेत होता. श्राद्धाच्या हत्येनंतर तो रात्रभर मृतदेहाजवळ बसून गांजा पीत होता, असे त्याने सांगितले आहे.
यंदाच्या जून महिन्यात पोलिसांनी दिल्लीतील पांडव नगर पोलीस स्टेशन हद्दीतील त्रिलोकपुरी परिसरात सापडलेले मानवी मृतदेहाचे तुकडे डीएनए चाचणीसाठी पाठवले आहेत. पोलिसांना मृतदेहाचे डोके, हात आणि पायाचा भाग सापडला होता. ही घटना श्रद्धाच्या मृत्यूनंतरची असल्याचे सांगितले जात आहे. जून महिन्यात आठवडाभरात तीन वेळा मृतदेहाचे हे तुकडे एका प्लॉटमध्ये फेकण्यात आले होते. मात्र हा मृतदेह कोणाचा होता हे अद्याप समजू शकलेले नाही. याठिकाणी देखील पोलिसांना सापडलेला डोक्याचा भाग अत्यंत वाईट अवस्थेत होता.

























































