‘आयएनएस विराट‘ 100 कोटीस विकण्यास तयार, युध्दनौका वाचविण्यासाठी अखेरचा पर्याय

जगातील सर्वात मोठी विमानवाहू युध्दनौका ’आयएनएस विराट’ तुटण्यापासून वाचविण्यासाठी अखेरचा पर्याय पुढे आला आहे. ही युद्धानौका 100 कोटी रुपयांना विकण्यास तयार असल्याचे या युध्दनौकेचे सध्याचे मालक श्रीराम ग्रुपकडून जाहीर करण्यात आले आहे. या युध्दनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यासाठी प्रयत्न सुरु असून त्यासाठी ही अखेरची संधी असल्याचे बोलले जात आहे.

आयएनएस विराट ही युद्धनौका 1987 साली हिंदुस्थानी नौदलात सामील झाली होती. 2017 साली तिला सेवेतून काढण्यात आल्यानंतर श्री राम ग्रुपने सुमारे 38.54 कोटींनी ही युध्दनौका विकत घेतली होती. काही दिवसांपूर्कीच या युध्दनौकेने आपला अखेरचा प्रवास सुरु केला होता. त्यानंतर मागील आठवडय़ात ही युध्दनौका गुजरातच्या अलंग येथील यार्डात पोहचली होती. याठिकाणी ही युध्दनौका तोडण्यात (स्क्रॅप) येणार आहे. याबद्दल बोलताना श्रीराम ग्रुपचे अध्यक्ष मुकेश पटेल म्हणाले की, ही युध्दनौका स्क्रॅप करण्यासाठी आपण लिलावात विकत घेतली होती. पण जर कोणाला ही युध्दनौका पुन्हा खरेदी करायची असल्यास त्यांना केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

ते पुढे म्हणाले की, देशाच्या प्रती असलेले प्रेम लक्षात घेऊनच मी ही युध्दनौका विकत घेतली होती. परंतु मुंबईतील एक कंपनी या युध्दनौकेचे संग्रहालयात रुंपातर करु इच्छिते, त्यामुळे आपण ही युध्दनौका विकण्यास तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. परंतु संरक्षण मंत्रालयाच्या परवानगी शिवाय आपण ही युध्दनौका विकू शकत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या युध्दनौकेसाठी आपण प्रथम 125 कोटी रुपयांची मागणी केली होती. परंतु ती कंपनी एक चांगले काम करीत असल्याने आपण आता 100 कोटींना ही युध्दनौका विकण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी आपण पुढील आठवडय़ापर्यंत थांबणार असून त्यानंतर या युध्दनौका क्रॅप करण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ज्या कंपनीने ही युध्दनौका विकत घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत, त्यांनी संरक्षण मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी युध्दपातळीवर तयारी सुरु केली असल्याची माहिती यावेळी समोर आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या