दीड हजार पानांचे आरोपपत्र दाखल, नाशिक धर्मांतर प्रकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीत घडलेल्या लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात विशेष तपास पथकाने शनिवारी नाशिक रोड न्यायालयात 1500 पानांचे आरोपपत्र दाखल केले. यात 17 साक्षीदारांच्या जबाबासह इतर भक्कम पुराव्यांचा उल्लेख केला आहे. त्याआधारे अनेक धक्कादायक खुलासेही करण्यात आले आहेत. मुंबई नाका पोलीस ठाण्यातील आठ गुह्यांबाबतही लवकरच आरोपपत्र दाखल केले जाणार आहे.

महिलांचा विनयभंग, अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून आयटी कंपनीतील निदा खानसह दानिश शेख, तौसिफ अत्तार व मतिन पटेल या संशयितांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आठ तर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात एक असे नऊ गुन्हे दाखल आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार विशेष तपास पथकामार्फत तपास सुरू आहे. पीडितेचे बळजबरीने धर्मांतर केल्याचे आणि इतर पुरावे तपासले जात आहेत.