आसाम-मेघालय सीमावाद पेटला! पोलीस गोळीबारात सहाजण ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसाम आणि मेघालयातील सीमावाद पुन्हा पेटला असून, पोलीस गोळीबारात सहाजण ठार झाले आहेत. यामध्ये मेघालयातील पाचजणांचा समावेश आहे. दोन्ही राज्यांमध्ये तणाव वाढला आहे. मेघालयाने 7 जिह्यांमध्ये 48 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद केली आहे. दरम्यान, मार्च 2022 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांमध्ये 70 टक्के सीमावाद संपल्याचा दावा केला होता. मात्र, त्यांचा दावा अवघ्या आठ महिन्यांत फेल झाला आहे.

काल आसामच्या पश्चिम कारबी अॅगलॉग जिह्यात वन विभागाच्या सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी मेघालयातून आलेला ट्रक रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी ट्रकमधील लोकांनी हल्ला केला. जादा पोलीस कुमक मागवून लाकडाची तस्करी करणाऱया ट्रकचा पाठलाग केला. पश्चिम जयंतिया हिल्स भागात आसाम पोलिसांनी गोळीबार करून ट्रक थांबवला. गोळीबारात पाचजण ठार झाले. जमावाने केलेल्या हल्ल्यात आसामच्या एका वनरक्षकाचा मृत्यू झाला, अशी माहिती आसाम पोलिसांनी दिली.

n या घटनेनंतर मेघालय सीमा भागातील जिह्यांमध्ये तणाव प्रचंड वाढला आहे. अनेक ठिकाणी हिंसाचार भडकला. मेघालयाचे मुख्यमंत्री संगमा यांनी आसाम पोलिसांनी आमच्या हद्दीत घुसून विनाकारण गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. यासंबंधीचे ट्विट संगमा यांनी केले असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, आसामचे मुख्यमंत्री हिमांता सरमा यांनी टॅग केले.