खारमध्ये गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत सहा जण गंभीर जखमी, कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खार पश्चिम कोळीवाडा येथे गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. जखमी रहिवासी 40 ते 50 टक्के भाजले असून त्यांच्यावर पालिकेचे वांद्रे भाभा आणि कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

खार पश्चिम खारदांडा, कोळीवाडा येथील हरिश्चंद्र बेकरीनजीक तळमजला अधिक एकमजली घरात सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास गॅस सिलिंडरमधून गॅस गळती होऊन आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवनांनीही घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी एका तासात अथक प्रयत्न करून सदर घरातील आग विझविली. मात्र या दुर्घटनेत सखुबाई जैस्वाल (65), प्रियांका जैस्वाल (26), निकिता मंडलिक (26), सुनील जैस्वाल (29) या चौघांना गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर आयसीयू मध्ये दाखल करण्यात येत आहेत. तर वंशिका चव्हाण (7, अत्यवस्थ) आणि प्रथम जैस्वाल (6) या दोघांना भाभा रुग्णालयामधून कस्तुरबा रुग्णालयात पुढील उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले आहे.