जास्त वेळ झोपाल तर जीवानिशी जाल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
जागरण आरोग्यासाठी घातक आहे, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागू नये.

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. यामुळे या दिवसात उबदार रजई ओढून झोपणं यासारखा दुसरा आनंद नाही. हे जरी खरं असलं तरी तुमची हीच गाढ झोप तुमच्या जीवावर बेतू शकते असा दावा युरोपच्या संशोधकांनी केला आहे. कारण सामान्यत: आपल्या मेंदूला 6 ते 8 तासांची झोप आवश्यक असते. पण थंडीमुळे जास्त झोप लागते. याचा थेट परिणाम हृदयाबरोबरच मेंदूवर होतो. ज्यामुळे या दिवसात हृदयाशी संबंधित समस्या वाढतात व झोपेतच हृदयविकाराचा झटका येतो प्रसंगी स्ट्रोकही होतो.

‘युरोपिययन हार्ट जर्नल’ मध्ये थंडी व अधिक झोप यावरील संशोधनावर आधारित एक लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात दिवसाला 6 ते 8 तासाहून जास्तवेळ झोपणाऱ्यांचा मृत्यू वेळेच्या आधी होतो असा दावा करण्यात आला आहे. तसेच सृदृढ तब्येतीसाठी झोप आवश्यक असली तरी या झोपेचेही एक प्रमाण आहे. यामुळे या प्रमाणाच्या बाहेर झोपल्याने मृत्युचा धोका वाढतो असे संशोधकांनी म्हटले आहे. जास्तीच्या झोपेचे व्यक्तीच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात असे यात संशोधकांनी म्हटले आहे. आपला हा दावा स्पष्ट करण्यासाठी संशोधकांनी  केलेल्या संशोधनाची महिती दिली आहे. यात तज्ज्ञांच्या टीमने  वेगवेगळ्या 21 देशांमधील व्यक्तींवर यासंबंधी प्रयोग केल्याचे स्पष्ट केले आहे. यात प्रामुख्याने 1,16,632 लोकांच्या झोपेचा डेटा तपासण्यात आला. यात 4 श्रीमंत देश कॅनडा, स्वीडन, सौदी अरब आणि संयुक्त आमिराती आणि मध्य उत्पन्न असलेले अर्जेंटीना, ब्राझील, चिली, चीन, कोलंबिया, ईरान, मलेशिया, पॅलेस्टाईन फिलीपाईन्स , पोलँड, साउथ अफ्रीका आणि तुर्की असे 12 देश. तसेच कमी उत्पन्न असलेले बांग्लादेश, हिंदुस्थान, पाकिस्तान , तंजानिया आणि झिम्बाब्वे या देशातील लोकांचा समावेश करण्यात आला होता. या लोकांची आर्थिक स्थिती, त्याचे जीवनमान , खाण्यापिण्याच्या सवयी, झोपेचे वेळ, व्यसन, शारीरिक हालचाली आणि आजार यांचे सर्वेक्षण करण्यात आले.

त्यात यातील अनेकजण 8 तासाहून जास्तवेळ झोपत असल्याचे समोर आले. तसेच त्यांची चाचणी केल्यानंतर त्यांना हृदयविकार व स्ट्रोकचा धोका असल्याचे निदर्शनास आले. थंडीमुळे रक्ताभिसरण क्रियेचा वेग मंदावतो त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण या दिवसात जास्त असते. जास्तवेळ झोपल्यामुळे हा धोका कैकपटीने वाढतो त्य़ातूनच पुढे जाऊन हृदयविकार व स्ट्रोक होऊ शकतो असे संशोधकांनी सांगितले आहे.