
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ‘लडकी हूं लड सकती हूं’ अशी घोषणा दिली आहे. या घोषणेची केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी खिल्ली उडवली आहे. घरी मुलगा आहे, पण लढू शकत नाही असं म्हणत त्यांनी प्रियंका गांधी यांच्यासह राहुल गांधी यांना खिजवण्याचा प्रयत्न केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इराणी यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर टीका केली.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी एक घोषणा केली होती. काँग्रेसच्या एकूण उमेदवारांपैकी 40 टक्के उमेदवार असतील असं त्यांनी जाहीर केलं होतं. ही घोषणा करत असतानाच त्यांनी ‘लडकी हूं लड सकती हूं’ अशी घोषणा दिली होती. स्मृती इराणी यांनी या घोषणेबाबत बोलताना म्हटले की याचा अर्थ असा होतो की ‘घरी मुलगा आहे पण लढू शकत नाही.’ इराणी पुढे बोलताना म्हणाल्या की ‘लोकशाहीमध्ये आणि राजकारणात लोकांनी प्रयत्न करू नयेत असं मी म्हणत नाही, जय-पराजय हे राजकारणाचा हिस्सा आहेत. मी 2014 ची निवडणूक हरले होते, मात्र तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांवर लोकांचा किती विश्वास आहे हे महत्वाचं आहे.’ हाच धागा पकडत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटले की लोकांना त्या माणसाबाबतही हीच भावना आहे का ?
हरदोई इथल्या जाहीर सभेत अखिलेश यादव यांनी 31 ऑक्टोबरला भाषण केले होते. या भाषणात त्यांनी महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिन्ना यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघर्ष केल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावरून इराणी यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. सरदार पटेलांचे काम अतुलनीय असून त्यांनी 500 संस्थानांमध्ये एकतेची भावना निर्माण केली होती. असा या व्यक्तिमत्वाची तुलना धर्माच्या आधारावर देशाची फाळणी करा असं म्हणणाऱ्या जिन्नांशी कशी केली जाऊ शकते असा प्रश्न इराणींनी विचारला आहे.