दोन दिवसांत तिघांना सापाचा दंश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

उरण तालुक्यातील पूर्व भागात दोन दिवसांमध्ये तीन लोकांना विषारी सापाने दंश केल्याच्या घटना घडल्या आहेत. या नागरीकांवर कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वर्गाने तात्काळ उपचार केल्याने आणि फ्रेंड्स ऑफ नेचर आणि सॅट स्नेक बाईट एक्शन टीमने यांना दवाखान्यात नेण्यामध्ये तत्परता दाखविल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.

उरण तालुका हा डोंगर कुशीत वसलेला तालुका असल्याने या तालुक्यातील नागरीक हे पावसाळ्यात डोंगर कुशीतील भाजी पाला गोळा करण्यासाठी, गुरेढोरे जंगलात घेऊन जाण्यासाठी आणि शेतीच्या मशागतीच्या कामांत गुंतलेले असतात त्यामुळे सर्प दंशाच्या घटना या घडत असतात. फ्रेंडस् ऑफ नेचर च्या sat (सॅट)-स्नेकबाईट ऍक्शन टीम ने गेल्या 3 दिवसात 3 सर्पदंश केस हाताळल्या आहेत. खोपटे गावची महिला जयश्री पांडुरंग पाटील यांना संध्याकाळी घोणस सापाचा दंश झाला होता. कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणीच नव्हतं म्हणून पुढे त्यांना मुंबईला जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. आवरे गावच्या गीता थळी याना शेतात काम करताना घोणस सापाचा दंश झाला आहे त्यांना वाशी मनपा च्या रूग्णालयात दाखल केले आहे. तर रानसई येथिल दिड वर्षाच्या लहान मुलाला कवड्या सापाने दंश केला. त्याच्यावर कोप्रोली पीएचसीमध्ये प्राथमिक उपचार करून नवी मुंबई मनपाच्या रूग्णालयात दाखल केले आहे.

उरण तालुक्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात सर्प दंशाच्या घटना घडत असतात त्यामुळे अडगळीच्या ठिकाणी हात घालताना खबरदारी घ्या. रात्री, पहाटे घराबाहेर पडताना चप्पल बूट घालून टॉर्च घेऊनच बाहेर निघा. गवतातून चालताना काठीने गवत बाजूला करून चाला, असे आवाहन फ्रेंड्स ऑफ नेचर आणि सॅट स्नेक बाईट एक्शन टीमने केले आहे.