सेवाधर्मीसंकल्पाचा वसा

761

>> दाजी पणशीकर

मांडा-टिटवाळा भागातील रुग्णसेवेचा अभाव जाणून विक्रांत बापट यांनी ‘क्रिएटिव्ह ग्रुप’ ही रुग्णोपयोगी सेवाभावी संस्था सुरू केली. या सेवाधर्मी संकल्पाचे रुपांतर आता ‘महागणपती रुग्णालय’ या सेवेत झाले आहे. या रुग्णसेवेचा प्रारंभ करणारे विक्रांत बापट यांनी हा संपूर्ण प्रवास ‘समर्पण’ या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. त्याचे प्रकाशन आज (15 डिसेंबर) मुंबई विद्यापीठाच्या माजी अधिष्ठाता डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते होत आहे.

संस्कृत भाषेतील एका सुभाषिताचा शेवटचा चरण खाली दिल्याप्रमाणे होता…
‘‘सेवाधर्मः परम गहनो योगिनां अपि अगम्यः।’’
‘‘सेवाधर्म इतका गहन असतो की, तो (सर्वज्ञ) योग्यांनाही समजण्यास कठीण जातो, नव्हे तो त्यांनाही कळत नाही!’’
सेवाधर्म खरंच इतका कठीण व अगम्य असतो का? तर त्या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असेच द्यावे लागेल! निखळ ‘निरपेक्षता’ हा सेवाधर्माचा भक्कम पाया असावा लागतो; आणि ‘अहंकारविसर्जन’ ही या धर्माची पहिली मागणी असते! या दोन परीक्षांमध्ये सहसा व सहजासहजी कोणी उत्तीर्ण होत नाही व होतही नसतो. पण अपवाद म्हणून क्वचित कोणी कधीतरी, कुठेतरी शंभर गुणांनी उत्तीर्ण होणारा एखादा परीक्षार्थी दृष्टीस पडला की, साऱ्या समाजालाच चवीने जगण्याची प्रेरणा मिळून जाते!
असे नव्याने उत्तीर्ण झालेले सेवाक्रती परीक्षार्थी म्हणून ज्यांच्याकडे मी मोठय़ा अपेक्षेने पाहतो, ते म्हणजे विक्रांत बापट आणि त्याचे सहकारी आणि त्यांची ‘क्रिएटिव्ह ग्रुप’ ही रुग्णोपयोगी सेवाभावी संस्था!

मांडा-टिटवाळा हे ठाणे जिह्यातील कल्याण शहराच्या तसे जवळचे ठिकाण असले तरी तेथे शहराच्या दृष्टीने विकास झालेला नव्हता. मुळात हा सर्व भूभाग ‘ग्रामीण’ असल्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी ‘कल्याण’वर अवलंबून राहावे लागे. सांस्कृतिक जडणघडण अशी या भागाची होतच नव्हती. शाळा आहे, पण महाविद्यालय नाही. खेळाडू आहेत, पण मैदानच नाही. नाटय़रसिक आहेत, पण नाटय़गृहच नाही. दवाखाने आहेत, पण प्रशस्त रुग्णालयच नाही अशी या ग्रामीण मांडा-टिटवाळाची दैन्यावस्था आणि दुरवस्था होती! सर्वात मोठी अडचण होती ती रुग्णालयाच्या अभावाची! दिवसा-उजेडी असो किंवा रात्री-अपरात्री असो, एखाद्या गंभीर आजारी रुग्णाला एकतर कल्याणला तरी, नाहीतर मुंबईला के.ई.एम. किंवा जे.जे.ला तरी न्यावे लागायचे! परंतु यावर तोडगा कोणीच शोधीत नव्हते.

अशी विपरीत परिस्थिती असताना मांडा येथील रहिवासी विक्रांत बापट हा नेमका मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात नोकरीला होता. त्याच्या धाकटय़ा भावाला एका विशिष्ट व्याधीच्या औषधोपचारांसाठी महिन्यातून एक-दोन वेळा रात्री-अपरात्रीही तातडीने केईएममध्ये दाखल करावे लागत असे! त्यामुळे विक्रांत अंतर्मुख झाला. ‘आपल्याला मांडा-टिटवाळा येथील जनतेच्या सोयीसाठी एखादे ‘रुग्णालय’ किंवा अल्पदरातील एखादी ‘रुग्णसेवा’ सुरू करता येईल काय?’ ही कल्पना विक्रांतच्या डोक्यात घोळू लागली आणि हिंदुजा रुग्णालयाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद लेले यांची सकारात्मक प्रेरणा, समाजभान देणारे मोलाचे मार्गदर्शन व सक्रिय सहाय्य यामुळे 28 ऑक्टोबर 2000 या दिवशी विक्रांत व त्याच्या तरुण शिलेदारांनी ‘क्रिएटिव्ह ग्रुप’ची स्थापना करून सेवाकार्य सुरू केले!

विक्रांतच्या साथीदारांनी प्रथम एका लहानशा दुकानाच्या गाळ्यात सुरू केले त्याचे नाव ‘क्रिएटिव्ह पॉलिक्लिनिक’ असे होते. येथे अल्पदरात रुग्णांची सर्व प्रकारची तपासणी-औषधापचार सुरू झाले. लोकांचा प्रतिसाद वाढू लागला तशी जागाही वाढू लागली आणि रुग्णोपयोगी नवनवीन रुग्णालयीन उपकरणेही जमू लागली! व्याप वाढू लागला, आकांक्षेने महत्त्वाकांक्षेची सीमा ओलांडली! सर्व मावळ्यांच्या तनामनातून एका सुसज्ज व अत्याधुनिक रुग्णालयाच्या घनगंभीर नाद घुमू लागला! साध्या कामनेचा देखणा ‘संकल्प’ झाला. अशा ‘सेवाधर्मी’ संकल्पाचे एका तपाने प्रशस्त प्रकल्पात रूपांतर झाले; आणि पाहता पाहता 2012 मध्ये मांडा-टिटवाळा या ग्रामीण भागात सेवाधर्मी व सेवाक्रती 10-12 तरुणांनी ‘महागणपती रुग्णालयाचा’ शुभारंभ केला!pramod-lele

‘क्रिएटिव्ह ग्रुप’च्या प्रथम संकल्पापासून मी या सर्व सुवर्ण क्षणांचा जवळचा साक्षीदार राहिलो आहे. गेल्या 18-19 वर्षांत मूळ संकल्पाचा प्रकल्प कसा झाला, ते विक्रांतने स्वतः सांगितल्याशिवाय आम जनतेला तपशिलाने कळणार नाही. म्हणून तसे ‘आत्मवृत्त’ विक्रांतने लिहून पुस्तकरूपाने प्रकाशित करावे, अशी कल्पना मी विक्रांतला दिली. त्यालाही ती कल्पना पटली, आवडली आणि त्यातून आज 15 डिसेंबर रोजी या ‘समर्पण’चे प्रकाशन होत आहे! ‘समर्पण’ हे आत्मवृत्त जसे एकटय़ा विक्रांतचे आहे, तसेच आणि तेवढेच ते ‘महागणपती रुग्णालया’चेही आहे! या ‘समर्पणा’त वेगवेगळी प्रकरणे नाहीत; कारण ‘समर्पण’हेच, एक मांडा-टिटवाळा या ग्रामीण भागातील कीर्तिमान असे स्वतंत्र ‘प्रकरण’च आहे!
मांडा-टिटवाळा या ग्रामीण भागातील काही तरुण ‘जनसेवा रुग्णसेवा’ या ध्येयाने झपाटतात काय आणि एक अप्रतिम सोयी-सुविधांचे रुग्णालय यशस्वीपणे उभे काय करतात, ही एक ‘स्वप्नसुंदर’ कहाणी ‘समर्पण’मध्ये ओघवत्या शैलीत शब्दांकित झाली आहे.

जवळ पैशाची पुंजी नाही, कोणी बलाढय़ पुंजीपती जवळचा मित्र नाही, समोरचा समाज उदासीन व निरुत्साही अशा विपरीताला तोंड देत देत या ध्येयवादी तरुणांनी ‘क्रिएटिव्ह पॉलिक्लिनिक’ कसे सुरू केले असेल? तर त्याचे उत्तर असे की, विक्रांत व त्याच्या सर्व सहकाऱयांनी आपल्या मासिक पगारातून अर्धेअधिक रक्कम या सेवाकार्यासाठी दर महिना खर्च केली. मनुष्यवृत्तीचे निरीक्षण केले तर असे लक्षात येईल की, काही निश्चित ‘लाभ’ होण्याची खात्री असल्याशिवाय मनुष्य फुकाफुकी एक रुपयासुद्धा कधी कोणाला देणार नाही व देतही नसतो. या पार्श्वभूमीवर या तरुणांचे हे आर्थिक दातृत्व नुसतेच लक्षणीय नसून ते विशेष गौरवास्पदही ठरले आहे!

एका साध्या दुकानाच्या गळ्यात सुरू झालेल्या छोटय़ाशा ‘पॉलिक्लिनिक’चे आता विशाल अशा ‘महागणपती रुग्णालया’त रूपांतर होऊन स्थलांतर झाले आहे! आज या ‘क्रिएटिव्ह ग्रुप’च्या प्रशस्त रुग्णालयात 50 खाटांची व्यवस्था असून सध्या तेथे 35 ते 40 खाटा उपयोगात आहेत. रुग्णालयाच्या सेवेसाठी व देखभालीसाठी 25 डॉक्टरांची फौज दिवसरात्र उपलब्ध आहे. संपूर्ण रुग्णालयात परिचारिका, सहाय्यक असे मिळून 50 कर्मचारी कार्यरत आहेत; आणि संपूर्ण इमारतीची अहोरात्र स्वच्छता व देखभाल करण्यासाठी वेगळे 25 कर्मचारी सेवेत आहेत! म्हणजे केवळ रुग्णांची सेवा उत्तम प्रकारे करता यावी, यासाठी येथे 75 जणांची एक तुकडी सतत राबताना दिसते आहे!subhash-joshi

स्वार्थ बाजूला सारून परार्थाची कास धरायची म्हणजे आपल्या हाताने पैसा, मानसन्मान की कीर्ती आणि अभिलाषा यांचे अनावर पंख आपल्याच हातांनी प्रथम कापावे लागतात! सत्कार्य क्रिकिंवा सेवाकार्य स्वतःची नावनिशाणी पुसल्याशिवाय कधी सुरूच होत नसते! ‘मी’, ‘माझे’ व ‘मला’ ही त्रिपुटी स्वहस्ते पुसल्याशिवाय कोणाला कधी सेवाधर्म कळत नाही आणि ‘ते’ केल्याशिवाय कधी सेवाकार्याचे प्रचंड प्रकल्प कधी उभेही राहत नाहीत, हे अटळ असे सत्य असते! या सत्याची खात्री पटल्यामुळेच उदारहृदयी प्रमोद दलाल स्वतःच्या मालकीची तीन गुंठे जमीन रुग्णालयासाठी घेऊन पुढे आले! या तरुणांची निरपेक्ष सेवावृत्ती पाहून टिटवाळा येथील ‘महागणपती देवस्थान’चे प्रमुख विश्वस्त माननीय सुभाष जोशी दीड कोटी रुपयांचा धनकोष घेऊन उपलब्ध झाले आणि पहिल्या दिवसापासून तो आजवर सर्व प्रकल्पाच्या पूर्ततेपर्यंत आपुलकीने मार्गदर्शन करणारे ‘हिंदुजा हॉस्पिटल’चे प्रमोद लेले शेवटपर्यंत या तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले! म्हणून आजचा यशस्वी दिवस उजाडला आहे!
‘‘मुक्या मनाने किती उधळावे
शब्दांचे बुडबुडे’’।
– इति सुभगेयं लेखनसीमा विराजते।

आपली प्रतिक्रिया द्या