राज्यपाल कोश्यारी ‘चले जाव’च्या घोषणांनी सोलापूर दणाणले सोलापूर बंद कडकडीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर, दि. 16 (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्ये करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्यातील सत्ताधारी भाजप नेत्यांच्या निषेधार्थ शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या ‘सोलापूर बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी सोलापूर शहरात निघालेल्या महामोर्चात विविध राजकीय पक्षांच्या संघटना, व्यापारी संघटना, राजकीय कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी ‘राज्यपाल कोश्यारी चले जाव’, ‘चंद्रकांत पाटील मुर्दाबाद’च्या घोषणांनी सोलापूर शहर दणाणून गेले होते. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी संघटनांनी बंदमध्ये सहभाग नोंदविला.

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आज (दि. 16) ‘सोलापूर बंद’ची हाक देण्यात आली होती. गेले आठ-पंधरा दिवस या बंदचे नियोजन सुरू होते. सोलापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीविक्रेते, आडत व्यापारी, भुसार व्यापारी, हमाल, तोलणार या संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे बाजारपेठेतील कोटय़वधींचा व्यवहार ठप्प झाला. गुरुवारी रात्रीपासूनच शहरात भाज्यांची आवक झाली नव्हती. सकाळपासूनच शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंदच्या निमित्ताने शहरातील प्राथमिक, माध्यमिक शाळा, कॉलेज बंद होते. त्यामुळे नेहमीची वर्दळ थंडावली होती. नवी पेठ, चाटी गल्ली, टिळक चौक, बाळीवेस, सराफ बाजार, मधला मारुती, कस्तुरबा मार्केट, मार्केट यार्ड, पूर्व विभाग, साखर पेठ भागातील दुकाने बंद होती. सोलापूरकरांनी स्वतŠहून दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदवला आणि शासनाचा निषेध केला. शहरातील एसटी बससेवा, बँका, शासकीय कार्यालय व अन्य संस्था सुरू होत्या.

आज सकाळी 9 वाजता एसटी स्टॅण्ड परिसरातील पांजरापोळ चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महारॅलीचा प्रारंभ झाला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण,  शहरप्रमुख विष्णू कारमपुरी, माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे, प्रा. अजय दासरी, महेश धाराशिवकर, विजय पुकाळे, दत्ता भोसले, माकपचे माजी आमदार नरसय्या आडम, अनिल वासम, वीरेंद्र पद्मा, युसूफ मेजर, विल्यम ससाणे, अकील शेख, विजय आडसुळे, श्याम आडम, बालकृष्ण मल्याळ, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, सुधीर खरटमल, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, पद्माकर काळे, राजन जाधव, माउली पवार, संतोष पवार, नगरसेवक तौफिक शेख, राजन कामत, एमआयएमचे फारुख शाब्दी, शिवजन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष शेखर फंड, सुनील कामाठी, श्रीकांत डांगे, देवेंद्र कोठे, अनिकेत पिसे, ‘प्रहार’चे अजित कुलकर्णी, जमीर शेख, मतिन बागवान, मातंग समाजाचे अध्यक्ष सुहास शिंदे, सोहन लोंढे, देवा उघडे, कांत उघडे यांच्यासह रिक्षा संघटना, स्कूल बस संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी महारॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चले जाव’, ‘चंद्रकांत पाटील मुर्दाबाद’च्या घोषणांनी सोलापूर शहराचा परिसर दणाणून गेला होता.

महारॅलीच्या वतीने एकत्रितपणे शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या अभिवादन रॅलीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, प्रहार संघटना, एमआयएम, संभाजी आरमार, संभाजी ब्रिगेड अशा विविध संघटना, राजकीय पक्षाचे आठ ते दहा हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सोलापूरकरांचे आभार – पोलीस उपायुक्त विजय कबाडे

n ‘सोलापूर बंद’ शांततेत पार पाडल्याबद्दल पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी सोलापूरकरांचे अभिनंदन करीत आभार मानले. पोलीस उपायुक्त कबाडे यांनी शहरात आज विविध संघटनांनी पुकारलेला बंद शांततेत व कोणतेही गालबोट न लागता पार पाडला आहे. ‘बंद’च्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. काहीजणांवर जुजबी कारवाई करण्यात आली असून, आजचा ‘बंद’ शांततेत पार पाडल्याबद्दल सोलापूरकरांचे व विविध संघटनांचे अभिनंदन करत आभार मानले.

राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करा

भाजप नगरसेवक कामाठी यांची मागणी

n छत्रपती शिवरायांचा अवमान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करा, अशी मागणी भाजपचे नगरसेवक सुनील कामाठी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. ‘सोलापूर बंद’मध्ये सहभागी झालेल्या कामाठी यांनी राज्यपालांचा निषेध करीत त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी करीत यापुढे असे वक्तव्य करणाऱयांच्या विरोधात तीक्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

‘एमआयएम’ही बंदमध्ये सहभागी

 छत्रपती शिवरायांविषयी अवमानकारक वक्तव्ये करणारे राज्यपाल कोश्यारी व चंद्रकांत पाटील यांचा ‘एमआयएम’च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. ‘सोलापूर बंद’मध्ये एमआयएमचे  शहराध्यक्ष फारूख शाब्दी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. देशातील महापुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्ये करणाऱया राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध करीत भाजप देशात तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे. भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, चीन आक्रमण यांसारख्या मुद्दय़ांवरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप अशी स्टंटबाजी करीत असल्याचा आरोप फारूख शाब्दी यांनी केला आहे.