आईचा खून करणाऱया मुलाला जन्मठेपेची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

 जुगारासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून आईचा खून करणाऱया तरुणाला जिल्हा व सत्र न्यायाधीश मिलिंद भोसले यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

वंदना कोळेकर असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. अतुल एकनाथ कोळेकर (दोघे रा. शेळगी, सोलापूर) असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 अतुल कोळेकर हा आई वंदना यांच्याबरोबर राहत होता. त्याला जुगार खेळण्याचे व्यसन लागल्याने पत्नी माहेरी गेली आहे. घटनेच्या दिवशी रात्री अतुल हा आईकडे जुगारासाठी पैसे मागत वाद घालत होता. आईने पैसे न दिल्याने तिच्या डोक्यात लोखंडी पाइपने जबर मारहाण केली. यात त्या गंभीर जखमी होऊन मरण पावल्या. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 या खटल्यात सात साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱयांची साक्ष व पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपी अतुल कोळेकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने ऍड. रामपुरे, तर आरोपीच्या वतीने ऍड. चव्हाण यांनी काम पाहिले.