राष्ट्रकुल स्पर्धेआधीच हिंदुस्थानला मोठा झटका, धावपटू एस. धनलक्ष्मी, तिहेरी उडीपटू ऐश्वर्या बाबू उत्तेजक सेवन चाचणीत दोषी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेला अवघे काही दिवस उरलेले असतानाच हिंदुस्थानसाठी पदकाच्या प्रबळ दावेदार गणल्या जाणाऱ्या दोन महिला ऍथलिट्स उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. या प्रकाराने हिंदुस्थानी चमूला मोठा झटका बसला आहे.

28 जुलैपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी 72 देशांतील जवळपास चार हजार 500 खेळाडू खेळताना दिसणार आहेत. हिंदुस्थानातूनदेखील जवळपास 230 खेळाडूंचा सहभाग असलेला चमू बर्मिंगहॅमला जाणार आहे, मात्र त्यापूर्वीच हिंदुस्थानला मोठा धक्का बसला आहे. पदकांच्या प्रबळ दावेदार असलेल्या धावपटू एस. धनलक्ष्मी आणि तिहेरी उडीमध्ये राष्ट्रीय विक्रम नावावर असलेली ऐश्वर्या बाबू या महिला खेळाडू उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत (डोप टेस्ट) दोषी आढळल्या आहेत. जागतिक ऍथलेटिक्सच्या ‘ऍथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट’ने (एआययू) घेतलेल्या चाचणीत धनलक्ष्मीने प्रतिबंधित स्टेरॉइड्स सेवन केल्याचे निदर्शनास आले आहे.

सर्वोत्तम महिला ऍथलिट्स उत्तेजक सेवन चाचणीच्या फेऱ्यात

एस धनलक्ष्मी शंभर मीटर आणि 4 बाय 100 मीटरमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार होती. युजीन येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीदेखील ती हिंदुस्थानी संघातही होती, पण व्हिसाच्या समस्येमुळे ती जाऊ शकली नव्हती. धनलक्ष्मीने 26 जून रोजी ‘कोसानोव्ह मेमोरियल ऍथलेटिक्स मीट’मध्ये 200 मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. गेल्या महिन्यात चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपदरम्यान राष्ट्रीय उत्तेजक द्रव्यविरोधी संस्थेच्या (नाडा) अधिकाऱयांनी ऐश्वर्या बाबूचे नमुने घेतले होते. त्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ऐश्वर्याने चेन्नईमधील स्पर्धेत तिहेरी उडी मारून राष्ट्रीय विक्रम केला होता. तिने 6.73 मीटर लांब उडी मारली होती. कोणत्याही हिंदुस्थानी खेळाडूची ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. यापूर्वी अंजू बॉबी जॉर्जने 6.83 मीटर लांब उडी मारली होती.