सीमेवरून घुसखोरी करणाऱ्यांची खैर नाही, इस्रोचा ‘स्पाय सॅटेलाइट’ रिसॅट – 2 बीआर 1 ठेवणार ‘कडक पहारा’

340

हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून रिसॅट – 2 बीआर 1 हा हेरगिरीसाठी सक्षम असलेला ‘स्पाय सॅटेलाइट’ अवकाशात सोडून प्रस्थापित केला. हे महत्त्वपूर्ण प्रक्षेपण पीएसएलव्ही-सी 48 या अग्निबाणाच्या मदतीने यशस्वीपणे पार पाडण्यात आले. यापूर्वी इस्रोने पृथ्वीच्या देखरेखीसाठी आणि भूमापनासाठी कार्टोसेट – 3 हा हायटेक उपग्रह अवकाशात सोडला होता पण आताच्या नव्या रिसॅट – 2 बोअर 1 मध्ये लावलेल्या रडारमुळे तो देशांच्या सीमांवर अवकाशातून करडी नजर ठेवू शकणार आहे.

देशांच्या सीमांवरून घुसखोरी करणाऱया दहशतवादी टोळय़ांच्या हालचाली टिपणे आता रिसॅट – 2 मुळे लष्कराला सहज शक्य होणार आहे. रिसॅट – 2 चे वजन 628 कि. ग्रॅ. आहे. त्याच्यावर बसवलेल्या रडार प्रणालीमुळे तो हिंदुस्थानी सीमांवरून घुसखोरी करू पाहणाऱया शत्रूंच्या हालचाली अचूक टिपू शकणार आहे.

बहुउद्देशीय रिसॅट-2बीआर 1 चे फायदे
– या उपग्रहामुळे सीमावर्ती भागातील सुरक्षा अधिक बळकट होईल. सैन्य दलांना सुरक्षा रणनीती ठरवण्यात या उपग्रहाची मदत होईल.
– शत्रूच्या हालचाली या उपग्रहाच्या नजरेतून सुटण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे.
– कुठल्याही वातावरणात ढगांच्या आडूनही फोटो काढण्यास रिसॅट- 2 बीआर 1 सक्षम आहे.
– त्याशिवाय शेती, जंगल आणि आपत्तीच्या काळातही या उपग्रहाची मदत मिळणार आहे.
– पाकिस्तानातून होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी, सीमेपलीकडे दहशतवाद्यांचे तळ याची खडान्खडा माहिती हिंदुस्थानी लष्कराला मिळू शकेल.

आपली प्रतिक्रिया द्या