श्रीलंकेत आंदोलकांचे ‘सरकार’, राष्ट्रपती भवनात घेतली कॅबिनेट मीटिंग; पंतप्रधानांच्या घरात जेवणाच्या पंगती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीलंकेमध्ये सध्या जनता रस्त्यावर उतरली असून आंदोलकांनी राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानावर कब्जा केला आहे. हजारोंचा जमाव राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानी अक्षरश: धुडगूस घातल आहेत. रविवारी आंदोलकांनी एका नकली कॅबिनेट बैठकीचेही आयोजन केले होते. या बैठकीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह देशाच्या आर्थिक संकटावरही चर्चा करण्यात आली. तसेच पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या खासगी निवासस्थानी घुसून आग लावलेल्या घटनेवरही चर्चा केली. त्यामुळे श्रीलंकेमध्ये सध्या आंदोलकांचे ‘सरकार’ दिसत आहे.

जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा, राक्षसी महागाई, रसातळाला गेलेली अर्थव्यवस्था यात श्रीलंकेची जनता अक्षरशः होरपळली आहे. देश उद्ध्वस्त होऊनही सरकार ढिम्म असल्यामुळे जनतेच्या असंतोषाचा आगडोंब उसळला आहे. शनिवारी हा भडका उडाला आणि हजारो निदर्शकांनी राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या निवासस्थानी धडक मारली. आंदोलकांनी राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे यांच्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद लूटला.

रविवारी सलग दुसऱ्या दिवशी तीव्र निदर्शने सुरू ठेवण्यात आली. संतप्त जमावाने पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या खासगी निवासस्थानी घुसून आग लावली. तसेच पंतप्रधानांच्या महागड्या गाड्यांची, घरातील दुर्मिळ पुस्तके व शोभेच्या वस्तूंची प्रचंड तोडफोड केली. तसेच त्यांच्या घरात जेवणाच्या पंगतीही झोडल्या.

राष्ट्रपती फरार

दरम्यान, उठावाची चाहूल लागताच राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे देश सोडून पळून गेले असून, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनीही राजीनामा देण्याची घोषणा आहे. राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे देश सोडून पळाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ते 13 जुलैला आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

मे महिन्यात राष्ट्रपतींच्या मोठ्या भावाला सोडावे लागलेले पंतप्रधानपद

याच वर्षी मे महिन्यात राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे यांचा मोठा भाऊ आणि तत्कालिन पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना सरकारविरोधातील कारणांमुळे पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या दोन्ही बंधुंना श्रीलंकेच्या खराब आर्थिक परिस्थितीला जबाबदार धरले जात आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात जनक्षोभ उफाळून आला आहे.