
आर्थिक डबघाईला आलेल्या एसटी महामंडळाच्या प्रशासकीय कर्मचारी व अधिकाऱयांचे वेतन बुधवारी अखेर झाले. एसटी महामंडळाला राज्य सरकारच्या मदतीशिवाय कर्मचाऱयांचे वेतनही अदा करणे अवघड बनले आहे. मात्र हे वेतन महामंडळाच्या अंतर्गत निधीतून देण्यात आले आहे.
त्यामुळे दिवाळीचा सण तोंडावर आला असताना एसटी महामंडळाच्या कर्मचाऱयांना बोनस किती आणि कधी मिळणार असा पेच तयार झाला आहे. एसटी महामंडळाच्या राज्यातील सुमारे 10 हजार प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱयांचा ऐन दिवाळीच्या तोंडावर सप्टेंबरचा पगार रखडल्याने त्यांची कोंडी झाली होती. एसटीच्या कर्मचाऱयांचे वेतन देण्यासाठी महिन्याला 360 कोटी रुपये लागतात. मात्र, गेल्या तीन महिन्यांत दर महिन्याला 360 कोटी रुपयांऐवजी 100 कोटी रुपये राज्य सरकारने दिल्याने महामंडळाचे गणित बिघडले. एसटीचे सुमारे राज्यभरात सुमारे एक लाख कर्मचारी असून त्यांना दर महिन्याच्या सात तारखेला वेतन मिळते. चालक, वाहक तसेच यांत्रिकी कर्मचाऱयांचे वेतन परवा मिळाले.































































