अखेर बेस्टच्या मदतीला लाल परी आली, 76 एसटी बसेस मुंबईत गर्दीच्या मार्गावर धावणार

एकीकडे लोकलचे दरवाजे सर्वसामान्यांना बंद असताना एकट्या बेस्टच्या मानेवर सारा मुंबईकरांचा भार आल्याने बेस्टच्या मदतीला अखेर ‘लालपरी एसटी’ धावली आहे. बेस्टच्या महत्वाच्या गर्दीच्या मार्गावर गुरूवारपासून 76 एसटी बसेस धावणार आहेत. त्यामुळे नोकरदार वर्गाची गर्दीतून काही प्रमाणात सुटका होण्यास मदत होणार आहे.

मुंबईकरांना बेस्टमधून प्रवास करताना होणारी गर्दी पाहता एसटीकडून भाड्याने गाड्या घेण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून या भाडे तत्वावरील 76 एसटी बसेस मुंबई सेंट्रल डेपोमध्ये गुरूवारी दाखल झाल्या. या बसेसचा समावेश गर्दीच्या मार्गावर करण्यात आला आहे. मार्ग क्र. 4 लि.(हुतात्मा चौक ते ओशिवरा) क्र.7 लि. (विक्रोळी ते बॅकबे), मार्ग क्र.8 लि.(मंत्रालय ते शिवाजीनगर) मार्ग क्र.30 लि.( मुंबई सेंट्रल ते विक्रोळी ), मार्ग क्र.सी-72 (राणीलक्ष्मी चौक ते भार्इंदर) या मार्गांवर या एसटी बसेस चालविण्यात आल्या.

बेस्टच्या ताफ्यात सुमारे 3,500 बस असून त्यापैकी 3,200पर्यंत बसेस दररोज चालविल्या जातात. सध्या बेस्टने दररोज 16 लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. या सेवांवरील प्रचंड ताण लक्षात घेता आणि बसमधील गर्दी पाहता ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमाचे पालन होत नाही. त्यामुळे एसटीच्या बसेस भाड्याने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

3551 बसेसद्वारे मुंबईकरांना सेवा
पहिल्या टप्प्यात एसटीकडील 200 बसेसचा ताफा मुंबईकरांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. दर कि.मी. 75 रूपये भाड्याने या बस एसटी महामंडळ देणार आहे. त्यानुसार एसटीच्या 73 बस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या असून मुंबईकरांची काही प्रमाणात गर्दीतून सुटका होण्यास त्यामुळे मदत होणार आहे. अशा एकूण एक हजार एसटी बसेस बेस्टच्या ताफ्यात समाविष्ठ करण्यात येणार आहेत. या अतिरिक्त बसेसमुळे बेस्टने गुरुवारी दिवसभरात 3551 बसेसद्वारे मुंबईकरांना सेवा दिल्याची माहिती बेस्टच्या सूत्रांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या