जिल्हास्तरावर सरसकट टाळेबंदी नाही; सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाची भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘टाळेबंदी’ हा कोरोना रोखण्याचा उपाय नसून प्रत्येकाने आपली काळजी आपणच घेणे आणि सरकारने जारी केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी फायदा होणार आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर टाळेबंदीबाबत कोणतीही घोषणा व्यापारी महासंघाच्या वतीने केली जाणार नसल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने स्पष्ट केले आहे. कुडाळ व्यापारी संघाच्या बैठकीत कुडाळ शहरात पुन्हा एकदा एका आठवड्याची टाळेबंदी लागू करण्याची घोषणा करण्यात आली. त्यापाठोपाठ ओरोस आणि पणदूर येथील व्यापारी संघानी टाळेबंदी घोषित केली. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे.

व्यापारी संघाच्या सर्व तालुका अध्यक्षांशी व्यापारी महासंघाचे संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांनी सविस्तर चर्चा केली. सर्व व्यापारी संघासह जिल्ह्यातील बहुतांश व्यापारी महासंघाच्या मताशी सहमत आहेत. सरसकट टाळेबंदी करून कोरोना रोखण्याच्या दृष्टीने काहीही फायदा होणार नाही. मात्र,अर्थचक्र बंद पडून त्याचा मोठा आर्थिक फटका सर्वसामान्य नागरिकांनाच बसणार आहे. त्यामुळे महासंघाच्यावतीने जिल्हास्तरावर टाळेबंदीची कोणतीही घोषणा केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. स्थानिक पातळीवर परिस्थितीनुरूप संघटना म्हणून किंवा वैयक्तिकरित्या आपली दुकाने ज्यांना बंद ठेवायची असतील त्यांच्या वैयक्तिक भूमिकेचा किंवा स्थानिक संघटनांच्या निर्णयाचा महासंघ आदर करेल. मात्र, संपूर्ण जिल्ह्यात पूर्ण टाळेबंदी पुन्हा लागू करणे हे कोणाच्याही हिताचे नाही. सहा महिन्यांची कडक टाळेबंदी अनुभवल्यानंतर गणेश चतुर्थीपासून हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे आता सरसकट टाळेबंदी फायद्याची नसून प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी आणि सरकारने जारी केलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.